बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे:- डॉ. नरसिंग आप्पासाहेब कदम

 *विश्वकोश निर्मिती मंडळ*, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सन्मानीय *सदस्य* तथा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील *छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील प्रोफेसर*  मा. *डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम* सरांनी  *'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवलेखक प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन ठाणे येथील अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या* माझ्या *वेदनेचे काटे* या पहिल्या कवितासंग्रहाचे *समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे * अशा शब्दात लिहलेले सविस्तर व अभ्यासपूर्ण परीक्षण/ समीक्षण महाराष्ट्रातील 
*मराठवाडा साथी*, 
*राजधर्म*, 
*बालाघाटचा आवाज*, 
*अदिती एक्स्प्रेस*, 
*दंडाधिकार*,
*जगमित्र*
अशा नामवंत वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे.







https://www.facebook.com/share/p/1A2qpGhYzu/

सर, आपले खूप खूप धन्यवाद! आपण माझ्या *वेदनेचे काटे* या कवितासंग्रहाचे अतिशय समर्पक शब्दात समीक्षण लिहून/ परिचय करून दिला. आपली ही प्रतिक्रिया मला निश्चितच पुढील लिखाणासाठी बळ देणारी व दिशादायी आहे. 

धन्यवाद सर!💐🙏💐

🙏💐आपला स्नेहांकित

*सोमनाथ  पगार* (सॅप)

------------------------------------------

*सविस्तर परिचय खाली देत आहे*...

*समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह : वेदनेचे काटे*

           साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजमनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले असते. कविता हा त्यातलाच एक प्रकार. समाजात घडणाऱ्या घडामोडीचे चित्रण त्यातून टिपले जाते. कवी सोमनाथ पगार यांनी आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, प्रसंगांचे चित्रण या कवितासंग्रहातून शब्दबद्ध केले. कवी समाजाची विस्कटलेली घडी पाहून हतबल होतो. त्याच्या मनाला त्या वेदना बोचत राहतात. त्यामुळे कवीची लेखणी धारदार होते. शब्दबंबाळ अनुभवातून भावना व्यक्त होतात. त्या भावनेचा आविष्कार म्हणजे 'वेदनेचे काटे' हा कवितासंग्रह होय. 

               मानवी जीवन हे शब्द प्रामाण्यावर चालणारे होते. आज तसे राहिलेले नाही. एकदा का शब्द दिला तर मग कोणत्याही परिस्थितीत पाळला जायचा. मग त्यांच्यापुढे पैशाचे, पदाचे आमिषसुद्धा चालायचे नाही. दिवस जसजसे निघून गेले तसतसा काळ बदलत गेला. माणसे यंत्रवत बनत गेली. माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे फक्त आता पुस्तकातच शोभून उरलेले शब्द राहिले. यापासून माणूस कोसो दूर गेला. दिलेला शब्द मोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. नात्यातील ओलावा कमी होत गेला. माणुसकीहीन जगणे वाढले. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे तर कोसो दूरच पण त्याकडे संवेदनशीलतेने पाहणेपण बंद झाले. जो तो फक्त स्वतःपुरता विचार करू लागला. त्यामुळे जग दिशाहीन होत चाललेले आहे. स्वार्थांध जगाकडे पाहिले की मनाला काटे टोचायला लागतात. त्याच काट्याच्या वेदना ज्यातून टिपल्या तो कवितासंग्रह म्हणजे 'वेदनेचे काटे' होय. 

             जगरहाटी बदलत चाललेली आहे. जखमा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे बोचणारे काटे असह्य करू लागले आहेत. 

'काळजाला टोचे वेदनेचे काटे 
जगाचे व्यवहार सारे उफराटे'

       माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याची वृत्ती राहिलेली नाही. एकमेकांत दुरावा निर्माण होत आहे. माणसेच माणसांचे शत्रू बनलेले आहेत. एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. 

'माणुसकीचे झरे 
डोह आटलेले खारट, तुरट 
आग्या मोहोळाच्या हाती सत्ता 
भुतावळ करी थयथयाट'

       आता चांगल्यांचे दिवस राहिलेले नाहीत. वाईट व्यक्तींची सर्वत्र सत्ता पसरत आहे. माणुसकीचे झरे आटून खारट, तुरट, चवहिनांचे राज्य प्रस्थापित होत आहे. हे पाहून कवीला प्रश्न पडतो की हे 'वेदनेचे काटे' आता सहन कसे करावे? त्यामुळे ते मानवतेची प्रार्थना करतात.

 'ज्ञान मंदिरात नित्य,आमुची प्रार्थना 
समृद्धीचे गीत ओठी, विश्वाच्या कल्याणा'

    कवीला वाटते माणसाने राग, लोभ, भेदभाव विसरून प्रेमाने वागावे. जात-पात, धर्म या पलीकडे जाऊन जगावे. विकासाचे स्वप्न मनी बाळगावीत. सर्वांच्या ओठावर विश्वाच्या कल्याणाचे गीत असावे. अशी प्रार्थना कवी करताना दिसतात.

          दुसरीकडे कवी मराठी भाषेचे गोडवे गातात. आमची आई मराठी आहे सांगताना ते म्हणतात,

 'ज्ञानदेव, तुकाराम 
परंपरेचा आदर 
सोमनाथा मुखी गोड 
मराठीचा हा जागर' 

          हिंदी आमची मावशी आहे. आम्ही इंग्रजीचे बोट धरून चालत आहोत. पण माय मराठी ही आमची महत्त्वाची आहे. तिचा विसर पडू नये एवढेच कवीचे मागणे आहे. म्हणजे कवी मराठी भाषेचे संवर्धन करतात. ती प्रत्येकाच्या मुखात, कार्यात असावी असे त्यांना वाटते. 

              शेतकरी हा राजा आहे. त्याच्यावर सुलतानी आणि अस्मानी संकटे येत आहेत. तो जगला तर सगळे जग जगणार आहे. तो काळ्या आईची मनोभावे सेवा करतो. म्हणून तो ठामपणे म्हणतो,

'माझी काळी आई I
जन्माची पुण्याई ll 
उभी हिरवाई l 
आयुष्याची ll     

     या भूमिपुत्राने काळ्या आईची सेवा केल्यामुळेच सृष्टीवरील जीवाच्या तोंडात चार घास पडत आहेत. या शेतकऱ्याला आता, 

'घावलंय आता आम्हा अवजार 
मशागत करू तणामनाची 
कात टाकून झटकू जळमटं 
नवी पहाट सुख-समृद्धीची'

          नवा मार्ग सापडलाय. त्यामुळे तोही आता नवी वाट धुंडाळून विकासाकडे झुकलेला आहे. शेतकऱ्याच्या जीवनातील परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे कवीने ओळखले म्हणूनच कवी परिवर्तनवादी विचार मांडताना दिसतात.

            कवी स्वतःलाच स्वतःचा मित्र बनवतात. कारण कवीला माहीत आहे आपल्या आयुष्याचे आपणच विधाते आहोत. त्यासोबतच आपल्या जीवनात गुरुचे स्थान खूप मोठे आहे. त्यामुळे आपण आपल्या मनात 

'गुरुंप्रति श्रद्धा l
आदर,विश्वास ll 
जीवनात खास l 
स्थान माझ्या ll

          गुरुचा आदर असावा. तेच जीवनात प्रकाशज्योत पेटवतात. आपल्या देशामध्ये खरे मोलाचे स्थान हे मायबाप आणि मातीचेच आहे. म्हणून ते म्हणतात,

 'मायबाप आणि माती
ह्रदयाची नाळ नाती 
मायबाप काळजात
मातीवर खरी प्रीती'

 ह्या सर्वांची नाळ पक्की आहे. त्यांनीच आपली नाती जोडून ठेवलेली आहेत. आपल्या अभंग वाणीतून कवीने मानवी जन्माचे सार सांगितले.

'करावा संसारात l
थोढे उपकार ll
जन्माचे हे सार l
असते हो ll१ll

आपला जन्म आला तसा जातो. त्यासाठी आपण चांगले कर्म करावे. माणुसकीच्या धर्माची बिजे रोवावीत. असे कवीला वाटते. माणसाने आता भावनिक राहून चालत नाही. कारण,

'सोडताना रडलो मी गाव आता 
भावनांना उरला ना भाव आता'

       आता खोटेपणा, लबाडी, फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे माणसे ओळखायला शिका असे कवी म्हणताना दिसतात. 

               'वेदनेचे काटे 'या कवितासंग्रहातून कवी सोमनाथ पगार हे माणसांचे नाते निसर्गाशी जोडतात. माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे याची शिकवण देतात. आई- वडील, गुरुजन, समाजसेवक यांचा आदर करायला शिकवतात. श्रद्धा- अंधश्रद्धा ओळखून जीवनाचा मार्ग मार्गक्रमण करायला शिकवतात. प्राणीमात्रावर दया करायला सांगतात. मातीशी नाते घट्ट करतात कारण मातीशी इमान नाही राखले तर आपल्या आयुष्याचीच माती होते. हे कवींनी जाणले आहे. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप विसंगती निर्माण झालेली आहे. ते ओळखायला शिकण्याचा संदेश कवी देतात. यातील संबंध कविता आपल्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. आपण त्याचे नक्कीच स्वागत कराल. कवीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

समीक्षक 
डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम 
सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,उदगीर जि. लातूर. ९४०४७३१०१०

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

 *नि मि त्त मा त्र  – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह*  



आस्वादक: सोमनाथ पगार

संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९

https://www.facebook.com/share/p/1PhGJCV1WU/

व्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.

बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्ते तसेच यावेळी सन्मानित होणारे ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ प्राप्त साहित्यिक तसेच  प्रमुख पाहुणे भानुदास महाराज कोल्हापूरकर, लेखक संजय गोराडे, उद्योजक सागर शिंदे, कवी ज्ञानेश्वर शिळवणे, कामगार नेते रवींद्र शिंदे, आर्किटेक्ट महेश साळुंके, शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, उद्योगपती मोहन लबडे, भजन सम्राट सदानंद मगर, शिल्पकार स्वाती साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील ‘परिस पब्लिकेशन्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करत आहे. तर लोककवी विजय पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद शेलार, उद्योजक प्रकाश चव्हाण हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. विशेष म्हणजे हा सोहळा संत ज्ञानोबारायांच्या जन्मभूमीवर, त्यांच्या पवित्र मंदिरात पार पडत आहे.

आपल्या जीवन काळात समाजात वावरत असताना अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या भेटीगाठी होतात, सहजच एकमेकांशी संवाद साधला जातो. विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण होते, यातून व्यक्तीला आलेल्या अनुभवांचे/ विचारांच्या शिदोरीचे संचयन होत राहते. काही अनुभव इतके प्रभावी असतात की ते ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात घर करून राहतात. पर्यायाने ते आलेले अनुभव व भेटलेल्या प्रभावी व्यक्तींची माहिती इतरांना गरजेनुरूप कथन करावीशी वाटते. कधी कधी ही साखळी इतकी मोठी असू शकते की असे अनुभव कथा बनून जातात. यातूनच या कथांचा उदय झाला असावा. हे नक्की... एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे वास्तवदर्शी चित्रण म्हणजे कथा होय. हे आपणास विदित आहेच.

साहित्याला समाजाचा आरसा समजले जाते. साहित्य वाचल्याने वाचकांचे भावविश्व संपन्न होण्यास मदतच होते. वाचकांना येणाऱ्या अनुभवांचे कथन साहित्यात वाचावयास मिळत असल्याने वाचकाला असे साहित्य वाचताना स्वर्गीय आनंद तर मिळतोच व मनोरंजनही होते. परिणामी वाचक वाचण्यात गुंग होऊन जातो. असाच अनुभव मला या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचताना आला.

“व्यक्तीच्या जीवनात निमित्त या शब्दाला बरेच महत्व असते. हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकायला वा वाचायला मिळतो. अनेकदा आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार मनाशी बाळगतो, पण ती प्रत्यक्षात उतरते ती एखाद्या प्रसंगामुळे, एखाद्या क्षणामुळे किंवा एखाद्या छोट्या धाग्यामुळे ज्याला आपण निमित्त म्हणतो. हाच धागा पुढे कथा, कविता, प्रवासवर्णन, साहित्य अशा सर्जनशीलतेच्या रुपात उलगडत जातो. माझ्या बाबतीतही असंच झालं... माणसांच्या कहाण्या, समाजातील विसंगती, दुख, चढउतार यांनी माझं मन हलवलं. आणि या सर्वातूनच कथा लिहण्याची प्रेरणा उमलली.” असे स्पष्ट स्पष्टीकरण लेखकाने प्रांजळपणे आपल्या मनोगतात मांडले असल्याने वाचकाला कथा वाचायला व समजून घ्यायला अडचण येत नाही.

‘कुणीतरी कुणाच्या तरी जीवनात येतं आणि जीवन बदलून जातं,’ हेच मुळ आशयसूत्र या कथांमध्ये दडलेलं आहे. ध्येयवेड्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे ‘नि मि त्त मा त्र’ या कथासंग्रहातील कथा होय. या व्यक्तिरेखा लेखकाला आपल्या जीवनात कधीतरी भेटल्या, त्यांचे कार्य व कर्तुत्वाने लेखक भारावून गेल्याने हे सारं समाजाला उपयुक्त ठरू शकेल, असे वाटल्याने लेखनाने कथारूपाने वाचकांच्या समोर या व्यक्तिरेखा मांडल्या. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या या कथा वाचताना आपणही असेच कुणाच्या जीवनात किंवा असेच कुणीतरी आपल्या जीवनात निमित्तमात्र आले व आपले जीवन बदलून गेले याची जाणीव करून देणाऱ्या या कथासंग्रहातील सर्वच कथा आहेत.

साहित्य हे केवळ लिखित शब्द नसून त्यात लेखकाने आपल्या अनुभवांच्या सहायाने भावविश्व उभे केलेले असते. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा एक वेगळा विषय घेऊन वाचकांना समृद्ध करतात. प्रत्येक कथेतील पात्रांचे एक वेगळे विश्व आहे. विशेष म्हणजे यातील सर्वच पात्रे आपल्या जवळचे, आपल्या अनुभव विश्वातले भासतात. काही पात्रांना मी स्वतः भेटलो आहे किंवा त्यांच्याशी  मला संवाद साधण्याचे भाग्य लाभले आहे. त्यामुळे त्यांना मी ओळखतो आहे. उदा. विनोद भाऊ चौधरी. वानगीदाखल काही कथा पाहू,

पहिल्याच ‘नि मि त्त मा त्र’ या शीर्षक कथेत सुरवातीलाच “गावातील जुना वाडा” हे वाक्य लक्ष वेधून घेत वाचन सुरु होते. लेखक स्वतः नायकाच्या रूपाने संवाद साधत असल्याने, ते स्वतः जसे आहे तसे ‘सेम टू सेम’ (वाचकांना) भेटतात. या कथेतून या कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय विषय स्पष्ट होतो. आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्य पर्यंतचा प्रवास, या प्रवासात अनेक व्यक्ती भेटतात. काही सोबत राहतात तर काहींची साथ सुटते. यातून काही बिघडतात तर काही घडतात. तथापि, या प्रक्रियेत आपण निमित्तमात्र असतो, हे नक्की... जीवन प्रवास मात्र निरंतर सुरु राहतो !

'स्वप्नांची बीजे' या कथेत विनोदची दुर्दम्य इच्छाशक्ती वाचकांना प्रेरित करते. साध्या गावातील मुलगा स्वप्न पाहतो आणि आयुष्य उजेडमय करतो. पॉलिस्टर यार्न उत्पादनापासून सुरु केलेला उद्योगाचे पुढे शाळा, महाविद्यालयं, तंत्रशिक्षण संस्था, सौर उर्जा, पवन उर्जा वीज प्रकल्प, खाद्यप्रक्रिया उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र अशा वेगवेगळ्या उद्योगरुपी वटवृक्षात रुपांतर होते. भावी तरुण पिढीला हे निच्छितच प्रेरक व मार्गदर्शक आहे.

'विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी' या कथेत विज्ञान व अध्यात्माची सांगड घातलेली दिसून येते. ज्ञानेश्वरी केवळ भक्ती ग्रंथ नसून विश्वातील गुप्त उर्जेचे शास्त्रीय कोडे आहे. याची उकल वाचताना होत जाते.

‘नवस्वराज्य’ कथेत जातीपाती पेक्षा शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार यांचं महत्व सुधीरच्या व्यक्तिरेखेतून साकारलेलं आहे. ‘कर्मातला ईश्वर’ या कथेत कर्म व श्रद्धा दोन्ही महत्वाचे असतात. हे समजते. ‘देवदासी’ या कथेत रंगुच्या व्यक्तीरेखेद्वारे देवदासी या वाईट प्रथेवर लेखकाने आसूड ओढला आहे. कथा वाचता वाचता अंतर्मुख होऊन जायला वेळ लागत नाही. ‘हिरवी प्रतिज्ञा’ कथेतील पर्यावरणाचे महत्व भावी पिढ्यांसाठी दिशादायी आहे.  ‘आर्त हाक मुलींची’ कथेत कन्याचं नव्हे तर कन्या बचाव अभियान किती महत्वाचे आहे?, हे समजते. ‘हरिपाठाची दिव्यशक्ती’ तून उमजते कि, हरिपाठ केवळ मंत्राचा पाठ नसून आत्म्याशी जोडणारा बंध, जीवन जगण्याचा दिव्य मार्ग आहे. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’मधून आजच्या व्यावसायिक पत्रकारीतेच्या युगात अन्यायाचा पराभव करण्यासाठी लेखणी खरी तलवार आहे. हे उमगते. हीच आशय श्रुखला शेवटच्या कथेपर्यंत टिकवून ठेवण्यास लेखक यशस्वी झाल्याचे वाचताना आपल्या सहज लक्षात येते.

'भ्रष्ट यंत्रणा' या कथेत महाराष्ट्रातील सद्यस्थितीचे वर्णन केले असून कुणीतरी देवदूत येईल आणि ही भ्रष्ट यंत्रणा उलथून टाकील, हा आशावाद लेखक उराशी बाळगून असल्याचे जाणवते. खरोखर ही यंत्रणा म्हणजे मोठी कीड आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१४ साली अधिव्याख्याता-इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, म.तं.शि.सेवा, गट-अ या पदी माझी स्वतःची निवड झाली असून मी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. आजवर ना इथले प्रशासन ना नियुक्ती देऊ शकले ना इथली न्यायव्यवस्था न्याय...

प्रभावी संवादातून तसेच काव्यात्मक पेरणीतून विषयांची विविधता लेखकाने लीलया हाताळली आहे. तृतीय-पुरुषी कथन या कथासंग्रहातील बलस्थान म्हणता येईल. उत्तम कथानक, साधी, सोपी मात्र काळजाला भिडणारी, वाचताना सहज समजणारी भाषाशैली तसेच आपल्या परिचयाचे आपलेच वाटणारे पात्र, स्थळ, काळ यामुळे या कथा आपल्याच वाटल्या शिवाय राहत नाही.  

अध्यात्म, विज्ञान, सामाजिक रूढी परंपरा, जिद्द, संघर्ष, सहकार, एकात्मता, निसर्ग, राजकारण, मानवी मनोवृत्ती यांसह बदलत्या समाजातील वास्तव मांडत, अंतर्मनाचा शोध घेत तसेच श्रद्धा, निसर्ग, पर्यावरणाचे महत्व, समाजकारण अशा सर्वच विषयांना या कथा सहजच हात घालत वाचकांचे मनोरंजनासह समाज प्रबोधन करत अनेक स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबी या कथांमधून पानोपानी नजरेस पडतात.

समाजाचं वास्तवदर्शी चित्रण या कथांमध्ये असल्याने असे लिखाण वाचकांना भावते हे नक्की. साहित्य क्षेत्रात लेखक संदीप राक्षे यांचे यापूर्वी वारसा शिल्पकलेचा, हेमलकसा एक रोमहर्षक सफर, लेण्यांचा महाराष्ट्र व भटकंती इत्यादी पुस्तके प्रकशित झालेली आहेत.  विविध प्रकारच्या कथांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कथा आहेत.

शब्दांच्या उगमस्थानाला, आयुष्याच्या मूळ गाभाऱ्याला, श्वासामागील सामर्थ्याला अर्थात त्यांची आई मुक्ताबाई राक्षे यांना त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली असून लेखक संजय द. गोराडे यांची प्रस्तावना तसेच लेखक, समीक्षक, चित्रकार असलेले सचिन देवकाते यांची शुभेच्छा, हे या कथासंग्रहाचे विशेष आकर्षण आहेत. याचबरोबर साहित्य विश्वात मोठे नाव असलेले, चित्रकार अरविंद शेलार यांनी त्यांच्या अफाट व सखोल कल्पकतेने ‘निमित्तमात्र’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ साकारलेलं असून या मुखपृष्ठावर आध्यात्मिक दृष्टीचा आभास देणारा संत ज्ञानोबारायांचा गोपीचंदन टिळा तसेच भक्तिभावाने उभे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचे दोन्ही हात वर, जणू दैवी शक्तीला अर्पण करताना. त्यांच्या देहातली ती आनंदमग्न मुद्रा आणि पार्श्वभूमीतील रंगांची लय सांगते “मी काही करीत नाही, करतो ते श्रीविठ्ठल! मी फक्त 'निमित्तमात्र", हे असं सारं वाचकाला पाने पालटून कथा वाचायला प्रेरित करते.

या कथासंग्रहात निमित्तमात्र, स्वप्नांची बीजे, विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी, नवस्वराज्य, कर्मातला ईश्वर, देवदासी, हिरवी प्रतिज्ञा, आर्त हाक मुलींची, हरिपाठाची दिव्यशक्ती, लोकशाहीचा चौथा स्तंभ, भ्रष्ट यंत्रणा, आजाराचा बाजार, नको नको मना, ब्रम्हांड ऐकते मनाची हाक, सह्याद्रीचं रत्न, साहित्य सोनियाची खाणी, यशस्वी अभिनेता, गानोबाची देवराई, अरण्यऋषींचा वारसदार, धगधगते नेपाळ, न लगती सायास, इनाबाची पाऊलवाट, सोयीचे नाते, नीतिमंत श्रीमंत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, समस्येत अडकलेलं गाव, स्टेट्सने दुभंगलेली नाती अशा एकूण सत्तावीस वाचनीय कथा वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

वाचकांनी हा कथासंग्रह आवश्यक वाचावा हा आग्रह तसेच लेखक सन्माननीय संदीप राक्षे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

पुस्तकाचे नाव :- नि मि त्त मा त्र (कथासंग्रह)

ISBN            :- 978-81-991734-1-5

लेखक           :- संदीप राक्षे, संपर्क.           : ८६५७४२१४२१/ ९८५०२१७८४४ 

प्रस्तावना       :- लेखक संजय द. गोराडे

शुभेच्छा         :- लेखक, समीक्षक, चित्रकार सचिन देवकाते

प्रकाशक       :- परिस पब्लिकेशन्स, सासवड, ता- पुरंदर, जि- पुणे

मुखपृष्ठ         :- चित्रकार अरविंद शेलार

स्वागत मूल्य  :- ₹ ४००/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)

*आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप), नाशिक*

(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)               संवाद:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com

चित्रपट गीतकार/ कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ट्रान्सलेटर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

गीत:- प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी


 *सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷*

ही दीपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना

💐💐

*गीत:- प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी*


प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी

आनंदाचे तोरण हे अन् हर्षाची रांगोळी IlधृII


मनामनातील जाई सारे मिटुनी अंतर

गळाभेट घेई प्यारे भाऊ, बहीण, मैतर

घुमे प्रदूषणमुक्त दिवाळीची हो आरोळी ll१ll


लाडू, करंजी स्नेहाची उधळण ही सौख्याची

सुखसमृद्धीच्या राशी न्यारी रंगत नात्याची

सुख लक्ष्मीच्या पावली मुखी हो शंकरपाळी II२II


लक्ष्मी येता घरा दारा दुःख, दारिद्र्या पिटाळी

धन, धान्या बरकत, तेजोमय सांजवेळी

शब्द फुलांची आरास सवे पुरणाची पोळी ll३ll


पर्व मंगलमय हे उजळून गेली धरा

धनारोग्य सकलांना तेजोदीप दिगंतरा

परंपरा नि संस्कृती दिव्य ही मराठमोळी ll४ll

शुभेच्छूक

*सोमनाथ पगार आणि परिवार*, नाशिक

*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक                                                 (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ट्रान्सलेटर, ऑनलाईन  डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*

सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, 

Email:- sahityatirthasp@gmail.com

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (अ वर्ग)

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद

५.विश्व मराठी परिषद

*Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Quora, Whatsapp, X(Twitter), Linked in, Instagram, SoundCloud.

💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐

©® सर्व हक्क सुरक्षित 

कृपया, https://youtube.com/c/SahityaTirth

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच  https://somnathpagar.blogspot.com

हा Blog *Follow* करून *Subscribe*  करण्यास विसरू नका.

💐🙏

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

Somnath Pagar Fan Club♻️

https://t.me/somnathpagarfanclub  *हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा*💐

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

गावाकडच्या गोष्टी - अनुभव समृद्धआठवणी

गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
आस्वादक : सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९ https://www.facebook.com/share/p/1FepSLoTbG/ माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे, 'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय. ‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर कुठंतरी स्वप्नांच्या दुनियेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. मग कालांतराने पाहुण्यासारखं गावात कधीतरी येणं-जाणं होतं, पर्यायाने काळजात गावाचं महत्व अधिकच वाढत जातं. अप्रत्यक्षपणे कळत नकळतपणे आपल्या गावाचं गावपण व्यक्ती काळजात जपत सगळीकडे अभिमानाने मिरवत असते. गावात गेल्यावर तेथील शेतीमाती, शाळा, व्यक्ती, नदीनाले, डोंगरदऱ्या पहिल्यापेक्षा आपल्याला प्रिय वाटू लागतात. आणि आपसूकच आपल्या गावावर आपण अधिकच प्रेम करू लागतो. हे सारं लिहिण्याचे कारण म्हणजे माझे मार्गदर्शक ज्येष्ठ लेखक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नामवंत मुद्रितशोधक श्री अर्जुन वेळजाळी सरांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या आत्मबंधात्मक ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री. वि. ग. बोरस्ते, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, ज्येष्ठ लेखक डॉ. यशवंत पाटील, आकाशवाणीचे माजी संचालक कवी उत्तम कोळगावकर, माजी सनदी अधिकारी डॉ. बी. जी. वाघ, ज्येष्ठ लेखक, ॲड. मिलिंद चिंधडे, ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ गजलकार तुकाराम ढिकले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक श्री. अशोक दुधारे, गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष, माणुसमित्र सुरेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नामवंत अशा ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून चित्रकार प्रमोद जोशी यांनी रेखाटलेले बोलक्या मुखपृष्टासह प्रमोद जोशी व अभिषेक भंडारे यांनी रेखाटलेली आतील रेखाचित्रे, विजयालक्ष्मी मणेरीकर यांची समर्पक प्रस्तावना तसेच वाचकांचे भावविश्व श्रीमंत करणारे मृद्गंधात माखलेल्या आठवणी व अनुभवसमृद्ध ललितलेख ही या पुस्तकाची बलस्थाने म्हणावे लागतील. साहित्यिक आपले अनुभव, आपले भावविश्व आपल्या लिखाणातून मांडत असला तरी यातून वाचकांना निखळ आनंद देणे याबरोबरच वाचकांचे मनोरंजन करत त्यांचे भावविश्व समृद्ध करणे, भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत त्यांना दिशा देणे, हेसुद्धा मुख्य हेतू असतात. हे हेतू साध्य करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे मला या पुस्तकातील लेख वाचताना जाणवल्याशिवाय राहिले नाही. असे लिखाण वाचताना वाचक रममाण होतात, त्यांना त्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. असाच अनुभव मला हे पुस्तक वाचताना आला. 'जीवन म्हणजे अनुभवाची शाळा.' पावलोपावली आलेल्या अनुभवाच्या बळावर पुढील मार्गक्रमण ठरत असले तरी भावी आयुष्याची पायाभरणी बालपणीचे अनुभव तसेच प्राप्त परिस्थितीनुसार होत असते हे नक्की. एखादा साहित्यिक आपल्या साहित्यातून जनमानसाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असतो. ओघवत्या, सहज, सोप्या रसाळ भाषेत लिहिलेले या लेख असून आपल्या अनुभवांचं दालन लेखकाने या लेखांमधून वाचकांना मोकळं करून दिलं आहे. या लेखांमधील स्थळ, काळ, पात्रे आपल्या अवतीभवती असलेली, आपल्या जीवनातील वाटतात. आणि त्यामुळेच हे लेख वाचकांच्या मनाला भिडतात. सोडताना रडलो मी गाव माता भावनांना उरला ना भाव आता (भावनांना उरला ना भाव आता) तसेच नेहमी आठवतो मला आपला गाव मनातला तिथं माणसं डोंगराएवढी माणुसकीला समुद्राची खोली मुखी झिरपते सदा ज्यांच्या काळजातली बोली (आपला गाव मनातला) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहातील वरील ओळी मला हे लेख वाचताना परत परत आठवत होते. एकूणच काय तर हे लेख वैश्विक आहेत याची प्रचीती येते. त्यामुळे मी या ओळी इथे नमूद केल्या. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटले जाते. दररोज नवनवीन अनुभवांची शिदोरी अनुभवसंपन्न करत असते. त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. एकांतात हे सारं संचित आठवत आयुष्याची वाटचाल निरंतर सुरु राहते. यातूनच ‘गावाकडच्या गोष्टी’ सारख्या आत्मबंधात्मक लेखनाचा जन्म होतो. पहिल्या लेखात आपल्या गावाची ओळख करून देताना ‘वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव !’... गावापासून दूर गेले, की गावाकडील आईवडील, शेतीवाडी, शाळा, मित्र यांची आठवण येऊन गावातील सुखाची, आनंदाची कल्पना येते अन् मन गावाकडे धाव घेऊ लागतं. अशी सहज, समर्पक सुरुवात केली असल्याने एकूणच लेखांचा आवाका सहज लक्षात येतो. परिणामी वाचकाच्या मनात पुढे काय याची उत्सुकता वाढत जाते. तसे पहिले तर लेखक हे एक हाडाचे शिक्षक तर आहेच त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिक आहे. त्यांचे ‘सुविचारातील आई’, ‘वावी : ऐतिहासिक वारसा असेलेलं गाव’, ‘शालेय विशेष दिनविशेष’ आणि आता हे ‘गावाकडच्या गोष्टी’ इत्यादी दर्जेदार साहित्यिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रत्येक पुस्तक एक उत्तम साहित्यिक दस्तऐवज ठरावे असेच आहे. अवर्षणप्रवण भागात त्यांचे गाव येत असल्याने तसेच बालपणी भयंकर दुष्काळ सहन करावा लागल्याने प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करत त्यांना शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले, त्यासाठी प्रसंगी आईला विकावे लागलेले मंगळसूत्र, याची सल त्यांना सतत बोचत असल्याने ती त्यांच्या लेखणीतून झिरपली असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. गनिमी काव्याने गायींची केलेली सुटका, बैलाशी झुंज, डोके व कान झोडपणारा पाऊस, लळा लावणारी आठवणीतील शाळा, विनातिकीट प्रवास केल्याची सल अशा चित्तवेधक लेखांसह गुरुजींनी जीवनाला दिशा दिली हे सांगायला लेखक विसरत नाही. पूर्वी गावापासून दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांना रहावं लागे, अशा वेळी गावाकडून एस.टी. मधून जेवणाचा डबा पाठवला जाई. ही महत्वाची तसेच खडतर असली तरी जीवनाला दिशा देणारी अशी आठवण त्यांनी ‘विद्यार्थ्यांची अन्नपूर्णा : एस. टी.’ या लेखात उत्तमरित्या वर्णन केली आहे. आपल्या आईच्या बाबतीत मात्र लेखक हळवे होत ' त्यागमूर्ती माझी आई ' असे सार्थ वर्णन त्यांनी आपल्या आईचे केले आहे. अर्जुन वेलजाळी सरांचे ‘गावाकडच्या गोष्टी हे प्रेरणा देणारं, मनात आपल्या गावाबद्दल प्रेम निर्माण करणारं कथन आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग बोलके व वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहेत. हे लिहिताना त्यांची स्मरणशक्ती अफलातून असल्याचे जाणवते. बालपणीच्या घटना, प्रसंग जसे की, साळुंकीला झालेली इजा, खारुताईच्या पिलांची व चिमणीची झालेली हत्त्या, त्यावेळी असलेले मित्र, लाभलेले शिक्षक व या सर्वांची नावे आजही सरांच्या लक्षात आहेत हे विशेष. फक्त आर्थिक नव्हे तर प्रेम, माया, ममता, संस्कार, निसर्ग याबाबतीत श्रीमंत असणारी ग्रामसंस्कृती आजच्या पिढीला समजण्यास हे लेख हातभर लावतात. कारण ग्रामसंस्कृतीचं चित्र डोळ्यासमोर हे लेख वाचताना निर्माण होते. लोकप्रिय लेखकांची वाक्ये, वाक्प्रचार यांची चपलख पेरणी या लेखांमध्ये आढळते. आठवणींचा धांडोळा घेत त्यांनी प्रसंग वर्णन केलेले असून वाचकांना खिळवून ठेवतील अशी लेखांची मांडणी केली आहे. बालपण, आईवडील, भाऊबहिण, शाळा, कुटुंब, शिक्षक, आपले मित्र, जनावरे, एस. टी. यांसह लेखातील विविध पात्रे व व्यक्तिमत्वे सहजच आपली वाटून जातात. आयुष्यभर आपल्या गावाची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. थोडक्यात, गावाच्या आठवणींद्वारे त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवरील गावाला आठवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लहानपणी माझे जीवन घडत असताना माझ्यावर ज्या ज्या शिक्षकांनी उत्तम संस्कार केले, मित्रांनी नि:स्पृह सहकार्य केले अन् नातेवाइकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांना माझ्या या ‘गावाकडच्या आठवणी’ सविनय समर्पित !’ अशी समर्पक कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली आहे. या लेखसंग्रहात 'वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव', 'माझ्या आठवणीतील शाळा', 'शेतक-यांची सांस्कृतिक श्रीमंती –चुरमा, तुकडे,... असे एकूण चौतीस वाचनीय लेख वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. हा उहापोह करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज शुक्रवार दि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘गावाकडच्या गोष्टी’ या लेखक अर्जुन वेलजाळी सरांच्या पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ पासून दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होत आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतीवर व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी साहित्यात / कथाविश्वात प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे एक दर्जेदार लेखसंग्रह असून वाचकांनी हा लेखसंग्रह आवर्जुन वाचावा हा आवाहन व आग्रह करून लेखक अर्जुन वेलजाळी सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! *पुस्तकाचे नाव :-* गावाकडच्या गोष्टी ( आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह ) *ISBN :-* 978-93-5650-729-6 *लेखक :-* अर्जुन वेलजाळी. *संपर्क नं.* ९०४९५२२२४० *प्रकाशक :-* ग्रंथाली, मुंबई *प्रस्तावना :-* विजयालक्ष्मी मणेरीकर *मुखपृष्ठ :-* प्रमोद जोशी *रेखाचित्रे :-* प्रमोद जोशी, अभिषेक भंडारे *स्वागत मूल्य :-* ₹ २५०/- मात्र ( सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) *आस्वादक :-* सोमनाथ पगार (सॅप), नाशिक (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी,लेखक), ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.) *संपर्क क्र.:-* ९२७३३५७१५९, *Email :-* sahityatirthasp@gmail.com फ्लॅट न. १, वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर, रेशीमबंध लॉन्समागे, हिरावाडी, पंचवटी, नाशिक - ४२२००३.

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई

पुस्तक परिचय *निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई* आस्वादक:- सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. वृक्ष वेलींनी असे बहरून यावे
हिरवे स्वप्न नयनी दिसावे चांदण्यात फिरताना मग मी गीत हिरवाईचे गावे (हिरवे स्वप्न) या ओळी आहेत कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहातील हिरवे स्वप्न या कवितेतील. अलीकडच्या काळात वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे होणारी वृक्षतोड, त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास, परिणामी निसर्गाचं बदललेलं चक्र, यामुळे सततची दुष्काळ सदृश्य परिस्तिथी आणि बरेच काही... असे असले तरी ही परिस्तिथी कायमची अशीच न राहता निच्छित बदलेल हा मनाशी आशावाद आहे. श्रावणसरी बरसून गेल्यावर हिरवाई तर होईलच त्याचबरोबर कळ्यांची फुले होतील, हे नक्की. निसर्गाच्या स्थिती संवेदनशील कवयित्रीच्या मनाला विचार करायला भाग पाडते. हेच खरे! निसर्गाचं वास्तववादी रूप व हिरवाईचं स्वप्न या संग्रहातील कविता वाचकांना दाखविण्यास कवयित्री यशस्वी झाल्या आहे, असे मला या कविता वाचताना वाटून गेले. नदी खळाळून वाहत प्रवाही राहिली तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला जीवनदान देते. दैनदिन जीवनात अशा अनेक घटना घडत असतात. त्याकडे व्यापक विचारांनी व उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर चिंतनशील व्यक्ती आपल्या परीने अर्थ लावत या विश्वाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असते. आहे त्याहून अधिक सकारात्मक व चागले कसे होईल, यासाठी हा प्रयत्न असतो. कवी मनाच्या व्यक्तीही कवितेच्या माध्यमातून जनजागृती तसेच समाज प्रबोधन करत आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असते. कवयित्री सहज लिहून जाते, इथे निळ्या भोर आभाळाची डोंगरांना चादर खळखळणाऱ्या सागराला मिळे नद्यांचा पाझर (भारत माझ्या देशा) किंवा निळ्या आकाशी निजे हे सूर्य, चंद्र, तारे होता पहाट जागे होई झाड, वेली हे जग सारे (निळ्या आकाशी) वैश्विक भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आपल्या भारत भुला निसर्गाची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वृक्षवल्लीमुळे चारी दिशा सजलेल्या आहेत. उतरेच्या हिमालयाच्या रांगा व काश्मीरसारखे नंदनवन, दक्षिणेकडील नारळाच्या हिरव्या झाडांनी बहरलेले केरळ, पश्चिमेला गुलाबी जयपूर, चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असा पूर्वेकडील आसाम अशी समृद्धता आपल्या देशाची शान आहे. इतकेच नव्हे तर निळ्या आभाळातील गृह, तारे, इथली पक्ष्यांची किलबिल हे सारं काही अभिमान वाटावं असंच आहे. या भूतलावरील प्रत्येकाचं व्यक्तीमत्व वेगळं असतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. कवितासुद्धा एक व्यक्त होत आनंद मिळवण्याचं होण्याचं मध्यम असून या व्यक्त होण्यातून निर्मितीचा वेगळाच अद्भुत आनंद मिळत असतो. यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. या कवयित्रीला असे सृजनशील मन लाभले असल्याने भोवतालीच्या निसर्गातील घडामोडी तसेच वास्तवाला कल्पनाशक्तीच्या जोरावर काव्यात गुंफण्याची क्षमता लाभली आहे. कविता ही उदात्त कला असून कविता म्हणजे भावना आणि विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरलेला लेखन प्रकार. कवितेत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब उमटते तेसेच कवितेतून जीवन कळते, समजते आणि उमगतेसुद्धा. पाऊस न पडल्याने व्याकूळ होऊन, आभाळा रे आभाळा गरज तू आता तरी वाट पाहुनी जीवाला आस लागली खरी... शमतील वेदना मातीच्या थेंब थेंब पडुनी अंगावरी दुष्काळाच्या चक्रात जगणं झालंय भारी (आभाळा गरज तू) विकासाच्या नावाखाली झाडांची झालेली कत्तल, अमर्याद कार्बन उत्सर्जन त्यामुळे ऋतुमानात झालेला बदल. परिणामी पावसाची वानवा. पाऊस पडावा म्हणून शब्दाच्या माध्यमातून आर्त हाक काळजाला चिर्र करून जाते. पाऊस पडला तर जमिनीच्या भेगा मिटतील. दुष्काळाचं चक्र सरेल. करपून चाललेलं पिक वाचेल आणि बळीराजा सुखावेल. अशी कवयित्रीला आस आहे. या संग्रहात पानोपानी निसर्ग व हिरवाई बहरलेली कारण कवयित्री पर्यावरणप्रेमी असून वृक्षरोपण व संवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे जाणवते. डोंगरदऱ्या, वृक्षवल्ली, शेतीमाती यासह निसर्गाचा कानाकोपरा जसे की वसुंधरा, सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, पशुपक्षी मेघ, आभाळ हे सारे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. अधिनिक युगात निसर्गाची हिरवाई टिकली तरच भविष्य उज्ज्वल राहील असा जणू संदेशच या कवितांमधून झिरपत आहे. असे मला वाटते. यातूनच, मन हे माझे वेडे, वाऱ्यासंगे बोले झुळझुळणारा वारा हा स्वप्नमंजुरी खोले (पावसात उनाड वारा) किंवा नका तोडू ही झाडे किडा, मुंगी, पक्षी सारे झाडावर घर त्यांचे पडतील ते उघडे (नका तोडू ही झाडे) माणूस आपल्या कुटुंबासाठी घर बांधतो, आपल्या अपत्यांची, माय-बापाची काळजी घेतो, मग किडे, मुंगी पक्षी यांचे जीवन यापेक्षा वेगळे नाही. वृक्षतोड झालीतर त्यांचेही घरटे उध्वस्त होतेच ना? हा रास्त सवाल कवयित्रीने वाचकांपुढे ठेवला आहे. आजकालच्या माणसाचे वागणे पाहून कवयित्री व्यथित झाल्याशिवाय राहत नाही, आजच्या युगात यंत्राबरोबर काम करताना माणूसही जणू यंत्र झाला कलियुगातल्या या माणसातल्या माणुसकीचा अंतच झाला... (माणुसकीला जपा) माणसातल्या माणुसकीचा अंत झाली की काय असे क्षणभर वाटते न वाटते तर लगेच, बीजाने मातीत खोल-खोलवर रुजून दबकत उगी जगावे धरतीच्या उदरात अन्न पाणी घेऊन सामावून जावे (बीजाचे वृक्षात रुपांतर) असा नवनिर्मितीचा आशावाद निर्माण करत त्यांची कविता वाचकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. या संग्रहातील कवितांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडतात. बऱ्याच रचना या तालबद्ध आहेत. यातील शब्दांना नादमाधुर्य आहे. या रचना प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडीत असून मांडलेले विचार वास्तववादी व प्रभावी आहेत. भाषा सहज सोपी विषयाला साजेशी आणि वाचनातून वाचकांना निश्चितच आनंद देणारी आहे. कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांचा ‘हिरवाई’ हा कवितासंग्रह प्रगती प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून हा संग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. आजवर या कवयित्रीला व या कवितासंग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त असून सर्वच रचना वाचनीय आहेत. कवी किंवा कवयित्री लिहते याचे कारण आजूबाजूच्या घटनांचा संवेदनशील मनावर होणारा परिणाम. यामुळे मनाची अस्वस्थता, मनातील घुसमट कमी होण्यास मदत होते. कवितेच्या रुपात तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन भावनांचा निचरा होतो, तेव्हा स्वर्गीय आनंद लाभतो. यातून वाचणाऱ्यालाही आनंद लाभतोच. या कवितासंग्रहास धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. कवी प्रा. लक्ष्मण महाडिक, यांची समर्पक प्रस्तावना तसेच कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर व साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची पाठराखण हे या संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. आपले तीर्थरूप ‘ज्यांच्या आशीर्वादाने माझे काव्य स्फुरले आणि संस्काराने जीवनाचे सूर-तालात बहरले असे माझे आई व दादांच्या चरणी’ अशा शब्दात त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कविता आहेत. एकूण ७५ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘हिरवाई’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे दुसरे कारण म्हणजे मंगळवार, दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- हिरवाई कवयित्री :- डॉ. शोभा रवींद्र सातभाई, संवाद क्र. ९०११०५९७५७ प्रकाशक :- प्रगती प्रकाशन, नाशिक प्रस्तावना :- कवी प्रा. लक्ष्मण महाडिक शुभेच्छा :- कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके पाठराखण :- ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) *आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप), संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.