google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे:- डॉ. नरसिंग आप्पासाहेब कदम

 *विश्वकोश निर्मिती मंडळ*, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सन्मानीय *सदस्य* तथा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील *छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील प्रोफेसर*  मा. *डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम* सरांनी  *'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवलेखक प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन ठाणे येथील अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या* माझ्या *वेदनेचे काटे* या पहिल्या कवितासंग्रहाचे *समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे * अशा शब्दात लिहलेले सविस्तर व अभ्यासपूर्ण परीक्षण/ समीक्षण महाराष्ट्रातील 
*मराठवाडा साथी*, 
*राजधर्म*, 
*बालाघाटचा आवाज*, 
*अदिती एक्स्प्रेस*, 
*दंडाधिकार*,
*जगमित्र*
अशा नामवंत वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे.







https://www.facebook.com/share/p/1A2qpGhYzu/

सर, आपले खूप खूप धन्यवाद! आपण माझ्या *वेदनेचे काटे* या कवितासंग्रहाचे अतिशय समर्पक शब्दात समीक्षण लिहून/ परिचय करून दिला. आपली ही प्रतिक्रिया मला निश्चितच पुढील लिखाणासाठी बळ देणारी व दिशादायी आहे. 

धन्यवाद सर!💐🙏💐

🙏💐आपला स्नेहांकित

*सोमनाथ  पगार* (सॅप)

------------------------------------------

*सविस्तर परिचय खाली देत आहे*...

*समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह : वेदनेचे काटे*

           साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजमनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले असते. कविता हा त्यातलाच एक प्रकार. समाजात घडणाऱ्या घडामोडीचे चित्रण त्यातून टिपले जाते. कवी सोमनाथ पगार यांनी आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, प्रसंगांचे चित्रण या कवितासंग्रहातून शब्दबद्ध केले. कवी समाजाची विस्कटलेली घडी पाहून हतबल होतो. त्याच्या मनाला त्या वेदना बोचत राहतात. त्यामुळे कवीची लेखणी धारदार होते. शब्दबंबाळ अनुभवातून भावना व्यक्त होतात. त्या भावनेचा आविष्कार म्हणजे 'वेदनेचे काटे' हा कवितासंग्रह होय. 

               मानवी जीवन हे शब्द प्रामाण्यावर चालणारे होते. आज तसे राहिलेले नाही. एकदा का शब्द दिला तर मग कोणत्याही परिस्थितीत पाळला जायचा. मग त्यांच्यापुढे पैशाचे, पदाचे आमिषसुद्धा चालायचे नाही. दिवस जसजसे निघून गेले तसतसा काळ बदलत गेला. माणसे यंत्रवत बनत गेली. माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे फक्त आता पुस्तकातच शोभून उरलेले शब्द राहिले. यापासून माणूस कोसो दूर गेला. दिलेला शब्द मोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. नात्यातील ओलावा कमी होत गेला. माणुसकीहीन जगणे वाढले. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे तर कोसो दूरच पण त्याकडे संवेदनशीलतेने पाहणेपण बंद झाले. जो तो फक्त स्वतःपुरता विचार करू लागला. त्यामुळे जग दिशाहीन होत चाललेले आहे. स्वार्थांध जगाकडे पाहिले की मनाला काटे टोचायला लागतात. त्याच काट्याच्या वेदना ज्यातून टिपल्या तो कवितासंग्रह म्हणजे 'वेदनेचे काटे' होय. 

             जगरहाटी बदलत चाललेली आहे. जखमा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे बोचणारे काटे असह्य करू लागले आहेत. 

'काळजाला टोचे वेदनेचे काटे 
जगाचे व्यवहार सारे उफराटे'

       माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याची वृत्ती राहिलेली नाही. एकमेकांत दुरावा निर्माण होत आहे. माणसेच माणसांचे शत्रू बनलेले आहेत. एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. 

'माणुसकीचे झरे 
डोह आटलेले खारट, तुरट 
आग्या मोहोळाच्या हाती सत्ता 
भुतावळ करी थयथयाट'

       आता चांगल्यांचे दिवस राहिलेले नाहीत. वाईट व्यक्तींची सर्वत्र सत्ता पसरत आहे. माणुसकीचे झरे आटून खारट, तुरट, चवहिनांचे राज्य प्रस्थापित होत आहे. हे पाहून कवीला प्रश्न पडतो की हे 'वेदनेचे काटे' आता सहन कसे करावे? त्यामुळे ते मानवतेची प्रार्थना करतात.

 'ज्ञान मंदिरात नित्य,आमुची प्रार्थना 
समृद्धीचे गीत ओठी, विश्वाच्या कल्याणा'

    कवीला वाटते माणसाने राग, लोभ, भेदभाव विसरून प्रेमाने वागावे. जात-पात, धर्म या पलीकडे जाऊन जगावे. विकासाचे स्वप्न मनी बाळगावीत. सर्वांच्या ओठावर विश्वाच्या कल्याणाचे गीत असावे. अशी प्रार्थना कवी करताना दिसतात.

          दुसरीकडे कवी मराठी भाषेचे गोडवे गातात. आमची आई मराठी आहे सांगताना ते म्हणतात,

 'ज्ञानदेव, तुकाराम 
परंपरेचा आदर 
सोमनाथा मुखी गोड 
मराठीचा हा जागर' 

          हिंदी आमची मावशी आहे. आम्ही इंग्रजीचे बोट धरून चालत आहोत. पण माय मराठी ही आमची महत्त्वाची आहे. तिचा विसर पडू नये एवढेच कवीचे मागणे आहे. म्हणजे कवी मराठी भाषेचे संवर्धन करतात. ती प्रत्येकाच्या मुखात, कार्यात असावी असे त्यांना वाटते. 

              शेतकरी हा राजा आहे. त्याच्यावर सुलतानी आणि अस्मानी संकटे येत आहेत. तो जगला तर सगळे जग जगणार आहे. तो काळ्या आईची मनोभावे सेवा करतो. म्हणून तो ठामपणे म्हणतो,

'माझी काळी आई I
जन्माची पुण्याई ll 
उभी हिरवाई l 
आयुष्याची ll     

     या भूमिपुत्राने काळ्या आईची सेवा केल्यामुळेच सृष्टीवरील जीवाच्या तोंडात चार घास पडत आहेत. या शेतकऱ्याला आता, 

'घावलंय आता आम्हा अवजार 
मशागत करू तणामनाची 
कात टाकून झटकू जळमटं 
नवी पहाट सुख-समृद्धीची'

          नवा मार्ग सापडलाय. त्यामुळे तोही आता नवी वाट धुंडाळून विकासाकडे झुकलेला आहे. शेतकऱ्याच्या जीवनातील परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे कवीने ओळखले म्हणूनच कवी परिवर्तनवादी विचार मांडताना दिसतात.

            कवी स्वतःलाच स्वतःचा मित्र बनवतात. कारण कवीला माहीत आहे आपल्या आयुष्याचे आपणच विधाते आहोत. त्यासोबतच आपल्या जीवनात गुरुचे स्थान खूप मोठे आहे. त्यामुळे आपण आपल्या मनात 

'गुरुंप्रति श्रद्धा l
आदर,विश्वास ll 
जीवनात खास l 
स्थान माझ्या ll

          गुरुचा आदर असावा. तेच जीवनात प्रकाशज्योत पेटवतात. आपल्या देशामध्ये खरे मोलाचे स्थान हे मायबाप आणि मातीचेच आहे. म्हणून ते म्हणतात,

 'मायबाप आणि माती
ह्रदयाची नाळ नाती 
मायबाप काळजात
मातीवर खरी प्रीती'

 ह्या सर्वांची नाळ पक्की आहे. त्यांनीच आपली नाती जोडून ठेवलेली आहेत. आपल्या अभंग वाणीतून कवीने मानवी जन्माचे सार सांगितले.

'करावा संसारात l
थोढे उपकार ll
जन्माचे हे सार l
असते हो ll१ll

आपला जन्म आला तसा जातो. त्यासाठी आपण चांगले कर्म करावे. माणुसकीच्या धर्माची बिजे रोवावीत. असे कवीला वाटते. माणसाने आता भावनिक राहून चालत नाही. कारण,

'सोडताना रडलो मी गाव आता 
भावनांना उरला ना भाव आता'

       आता खोटेपणा, लबाडी, फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे माणसे ओळखायला शिका असे कवी म्हणताना दिसतात. 

               'वेदनेचे काटे 'या कवितासंग्रहातून कवी सोमनाथ पगार हे माणसांचे नाते निसर्गाशी जोडतात. माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे याची शिकवण देतात. आई- वडील, गुरुजन, समाजसेवक यांचा आदर करायला शिकवतात. श्रद्धा- अंधश्रद्धा ओळखून जीवनाचा मार्ग मार्गक्रमण करायला शिकवतात. प्राणीमात्रावर दया करायला सांगतात. मातीशी नाते घट्ट करतात कारण मातीशी इमान नाही राखले तर आपल्या आयुष्याचीच माती होते. हे कवींनी जाणले आहे. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप विसंगती निर्माण झालेली आहे. ते ओळखायला शिकण्याचा संदेश कवी देतात. यातील संबंध कविता आपल्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. आपण त्याचे नक्कीच स्वागत कराल. कवीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

समीक्षक 
डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम 
सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,उदगीर जि. लातूर. ९४०४७३१०१०

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

 *नि मि त्त मा त्र  – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह*  



आस्वादक: सोमनाथ पगार

संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९

https://www.facebook.com/share/p/1PhGJCV1WU/

व्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.

बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्ते तसेच यावेळी सन्मानित होणारे ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ प्राप्त साहित्यिक तसेच  प्रमुख पाहुणे भानुदास महाराज कोल्हापूरकर, लेखक संजय गोराडे, उद्योजक सागर शिंदे, कवी ज्ञानेश्वर शिळवणे, कामगार नेते रवींद्र शिंदे, आर्किटेक्ट महेश साळुंके, शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, उद्योगपती मोहन लबडे, भजन सम्राट सदानंद मगर, शिल्पकार स्वाती साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील ‘परिस पब्लिकेशन्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करत आहे. तर लोककवी विजय पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद शेलार, उद्योजक प्रकाश चव्हाण हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. विशेष म्हणजे हा सोहळा संत ज्ञानोबारायांच्या जन्मभूमीवर, त्यांच्या पवित्र मंदिरात पार पडत आहे.

आपल्या जीवन काळात समाजात वावरत असताना अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या भेटीगाठी होतात, सहजच एकमेकांशी संवाद साधला जातो. विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण होते, यातून व्यक्तीला आलेल्या अनुभवांचे/ विचारांच्या शिदोरीचे संचयन होत राहते. काही अनुभव इतके प्रभावी असतात की ते ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात घर करून राहतात. पर्यायाने ते आलेले अनुभव व भेटलेल्या प्रभावी व्यक्तींची माहिती इतरांना गरजेनुरूप कथन करावीशी वाटते. कधी कधी ही साखळी इतकी मोठी असू शकते की असे अनुभव कथा बनून जातात. यातूनच या कथांचा उदय झाला असावा. हे नक्की... एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे वास्तवदर्शी चित्रण म्हणजे कथा होय. हे आपणास विदित आहेच.

साहित्याला समाजाचा आरसा समजले जाते. साहित्य वाचल्याने वाचकांचे भावविश्व संपन्न होण्यास मदतच होते. वाचकांना येणाऱ्या अनुभवांचे कथन साहित्यात वाचावयास मिळत असल्याने वाचकाला असे साहित्य वाचताना स्वर्गीय आनंद तर मिळतोच व मनोरंजनही होते. परिणामी वाचक वाचण्यात गुंग होऊन जातो. असाच अनुभव मला या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचताना आला.

“व्यक्तीच्या जीवनात निमित्त या शब्दाला बरेच महत्व असते. हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकायला वा वाचायला मिळतो. अनेकदा आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार मनाशी बाळगतो, पण ती प्रत्यक्षात उतरते ती एखाद्या प्रसंगामुळे, एखाद्या क्षणामुळे किंवा एखाद्या छोट्या धाग्यामुळे ज्याला आपण निमित्त म्हणतो. हाच धागा पुढे कथा, कविता, प्रवासवर्णन, साहित्य अशा सर्जनशीलतेच्या रुपात उलगडत जातो. माझ्या बाबतीतही असंच झालं... माणसांच्या कहाण्या, समाजातील विसंगती, दुख, चढउतार यांनी माझं मन हलवलं. आणि या सर्वातूनच कथा लिहण्याची प्रेरणा उमलली.” असे स्पष्ट स्पष्टीकरण लेखकाने प्रांजळपणे आपल्या मनोगतात मांडले असल्याने वाचकाला कथा वाचायला व समजून घ्यायला अडचण येत नाही.

‘कुणीतरी कुणाच्या तरी जीवनात येतं आणि जीवन बदलून जातं,’ हेच मुळ आशयसूत्र या कथांमध्ये दडलेलं आहे. ध्येयवेड्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे ‘नि मि त्त मा त्र’ या कथासंग्रहातील कथा होय. या व्यक्तिरेखा लेखकाला आपल्या जीवनात कधीतरी भेटल्या, त्यांचे कार्य व कर्तुत्वाने लेखक भारावून गेल्याने हे सारं समाजाला उपयुक्त ठरू शकेल, असे वाटल्याने लेखनाने कथारूपाने वाचकांच्या समोर या व्यक्तिरेखा मांडल्या. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या या कथा वाचताना आपणही असेच कुणाच्या जीवनात किंवा असेच कुणीतरी आपल्या जीवनात निमित्तमात्र आले व आपले जीवन बदलून गेले याची जाणीव करून देणाऱ्या या कथासंग्रहातील सर्वच कथा आहेत.

साहित्य हे केवळ लिखित शब्द नसून त्यात लेखकाने आपल्या अनुभवांच्या सहायाने भावविश्व उभे केलेले असते. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा एक वेगळा विषय घेऊन वाचकांना समृद्ध करतात. प्रत्येक कथेतील पात्रांचे एक वेगळे विश्व आहे. विशेष म्हणजे यातील सर्वच पात्रे आपल्या जवळचे, आपल्या अनुभव विश्वातले भासतात. काही पात्रांना मी स्वतः भेटलो आहे किंवा त्यांच्याशी  मला संवाद साधण्याचे भाग्य लाभले आहे. त्यामुळे त्यांना मी ओळखतो आहे. उदा. विनोद भाऊ चौधरी. वानगीदाखल काही कथा पाहू,

पहिल्याच ‘नि मि त्त मा त्र’ या शीर्षक कथेत सुरवातीलाच “गावातील जुना वाडा” हे वाक्य लक्ष वेधून घेत वाचन सुरु होते. लेखक स्वतः नायकाच्या रूपाने संवाद साधत असल्याने, ते स्वतः जसे आहे तसे ‘सेम टू सेम’ (वाचकांना) भेटतात. या कथेतून या कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय विषय स्पष्ट होतो. आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्य पर्यंतचा प्रवास, या प्रवासात अनेक व्यक्ती भेटतात. काही सोबत राहतात तर काहींची साथ सुटते. यातून काही बिघडतात तर काही घडतात. तथापि, या प्रक्रियेत आपण निमित्तमात्र असतो, हे नक्की... जीवन प्रवास मात्र निरंतर सुरु राहतो !

'स्वप्नांची बीजे' या कथेत विनोदची दुर्दम्य इच्छाशक्ती वाचकांना प्रेरित करते. साध्या गावातील मुलगा स्वप्न पाहतो आणि आयुष्य उजेडमय करतो. पॉलिस्टर यार्न उत्पादनापासून सुरु केलेला उद्योगाचे पुढे शाळा, महाविद्यालयं, तंत्रशिक्षण संस्था, सौर उर्जा, पवन उर्जा वीज प्रकल्प, खाद्यप्रक्रिया उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र अशा वेगवेगळ्या उद्योगरुपी वटवृक्षात रुपांतर होते. भावी तरुण पिढीला हे निच्छितच प्रेरक व मार्गदर्शक आहे.

'विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी' या कथेत विज्ञान व अध्यात्माची सांगड घातलेली दिसून येते. ज्ञानेश्वरी केवळ भक्ती ग्रंथ नसून विश्वातील गुप्त उर्जेचे शास्त्रीय कोडे आहे. याची उकल वाचताना होत जाते.

‘नवस्वराज्य’ कथेत जातीपाती पेक्षा शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार यांचं महत्व सुधीरच्या व्यक्तिरेखेतून साकारलेलं आहे. ‘कर्मातला ईश्वर’ या कथेत कर्म व श्रद्धा दोन्ही महत्वाचे असतात. हे समजते. ‘देवदासी’ या कथेत रंगुच्या व्यक्तीरेखेद्वारे देवदासी या वाईट प्रथेवर लेखकाने आसूड ओढला आहे. कथा वाचता वाचता अंतर्मुख होऊन जायला वेळ लागत नाही. ‘हिरवी प्रतिज्ञा’ कथेतील पर्यावरणाचे महत्व भावी पिढ्यांसाठी दिशादायी आहे.  ‘आर्त हाक मुलींची’ कथेत कन्याचं नव्हे तर कन्या बचाव अभियान किती महत्वाचे आहे?, हे समजते. ‘हरिपाठाची दिव्यशक्ती’ तून उमजते कि, हरिपाठ केवळ मंत्राचा पाठ नसून आत्म्याशी जोडणारा बंध, जीवन जगण्याचा दिव्य मार्ग आहे. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’मधून आजच्या व्यावसायिक पत्रकारीतेच्या युगात अन्यायाचा पराभव करण्यासाठी लेखणी खरी तलवार आहे. हे उमगते. हीच आशय श्रुखला शेवटच्या कथेपर्यंत टिकवून ठेवण्यास लेखक यशस्वी झाल्याचे वाचताना आपल्या सहज लक्षात येते.

'भ्रष्ट यंत्रणा' या कथेत महाराष्ट्रातील सद्यस्थितीचे वर्णन केले असून कुणीतरी देवदूत येईल आणि ही भ्रष्ट यंत्रणा उलथून टाकील, हा आशावाद लेखक उराशी बाळगून असल्याचे जाणवते. खरोखर ही यंत्रणा म्हणजे मोठी कीड आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१४ साली अधिव्याख्याता-इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, म.तं.शि.सेवा, गट-अ या पदी माझी स्वतःची निवड झाली असून मी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. आजवर ना इथले प्रशासन ना नियुक्ती देऊ शकले ना इथली न्यायव्यवस्था न्याय...

प्रभावी संवादातून तसेच काव्यात्मक पेरणीतून विषयांची विविधता लेखकाने लीलया हाताळली आहे. तृतीय-पुरुषी कथन या कथासंग्रहातील बलस्थान म्हणता येईल. उत्तम कथानक, साधी, सोपी मात्र काळजाला भिडणारी, वाचताना सहज समजणारी भाषाशैली तसेच आपल्या परिचयाचे आपलेच वाटणारे पात्र, स्थळ, काळ यामुळे या कथा आपल्याच वाटल्या शिवाय राहत नाही.  

अध्यात्म, विज्ञान, सामाजिक रूढी परंपरा, जिद्द, संघर्ष, सहकार, एकात्मता, निसर्ग, राजकारण, मानवी मनोवृत्ती यांसह बदलत्या समाजातील वास्तव मांडत, अंतर्मनाचा शोध घेत तसेच श्रद्धा, निसर्ग, पर्यावरणाचे महत्व, समाजकारण अशा सर्वच विषयांना या कथा सहजच हात घालत वाचकांचे मनोरंजनासह समाज प्रबोधन करत अनेक स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबी या कथांमधून पानोपानी नजरेस पडतात.

समाजाचं वास्तवदर्शी चित्रण या कथांमध्ये असल्याने असे लिखाण वाचकांना भावते हे नक्की. साहित्य क्षेत्रात लेखक संदीप राक्षे यांचे यापूर्वी वारसा शिल्पकलेचा, हेमलकसा एक रोमहर्षक सफर, लेण्यांचा महाराष्ट्र व भटकंती इत्यादी पुस्तके प्रकशित झालेली आहेत.  विविध प्रकारच्या कथांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कथा आहेत.

शब्दांच्या उगमस्थानाला, आयुष्याच्या मूळ गाभाऱ्याला, श्वासामागील सामर्थ्याला अर्थात त्यांची आई मुक्ताबाई राक्षे यांना त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली असून लेखक संजय द. गोराडे यांची प्रस्तावना तसेच लेखक, समीक्षक, चित्रकार असलेले सचिन देवकाते यांची शुभेच्छा, हे या कथासंग्रहाचे विशेष आकर्षण आहेत. याचबरोबर साहित्य विश्वात मोठे नाव असलेले, चित्रकार अरविंद शेलार यांनी त्यांच्या अफाट व सखोल कल्पकतेने ‘निमित्तमात्र’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ साकारलेलं असून या मुखपृष्ठावर आध्यात्मिक दृष्टीचा आभास देणारा संत ज्ञानोबारायांचा गोपीचंदन टिळा तसेच भक्तिभावाने उभे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचे दोन्ही हात वर, जणू दैवी शक्तीला अर्पण करताना. त्यांच्या देहातली ती आनंदमग्न मुद्रा आणि पार्श्वभूमीतील रंगांची लय सांगते “मी काही करीत नाही, करतो ते श्रीविठ्ठल! मी फक्त 'निमित्तमात्र", हे असं सारं वाचकाला पाने पालटून कथा वाचायला प्रेरित करते.

या कथासंग्रहात निमित्तमात्र, स्वप्नांची बीजे, विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी, नवस्वराज्य, कर्मातला ईश्वर, देवदासी, हिरवी प्रतिज्ञा, आर्त हाक मुलींची, हरिपाठाची दिव्यशक्ती, लोकशाहीचा चौथा स्तंभ, भ्रष्ट यंत्रणा, आजाराचा बाजार, नको नको मना, ब्रम्हांड ऐकते मनाची हाक, सह्याद्रीचं रत्न, साहित्य सोनियाची खाणी, यशस्वी अभिनेता, गानोबाची देवराई, अरण्यऋषींचा वारसदार, धगधगते नेपाळ, न लगती सायास, इनाबाची पाऊलवाट, सोयीचे नाते, नीतिमंत श्रीमंत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, समस्येत अडकलेलं गाव, स्टेट्सने दुभंगलेली नाती अशा एकूण सत्तावीस वाचनीय कथा वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

वाचकांनी हा कथासंग्रह आवश्यक वाचावा हा आग्रह तसेच लेखक सन्माननीय संदीप राक्षे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

पुस्तकाचे नाव :- नि मि त्त मा त्र (कथासंग्रह)

ISBN            :- 978-81-991734-1-5

लेखक           :- संदीप राक्षे, संपर्क.           : ८६५७४२१४२१/ ९८५०२१७८४४ 

प्रस्तावना       :- लेखक संजय द. गोराडे

शुभेच्छा         :- लेखक, समीक्षक, चित्रकार सचिन देवकाते

प्रकाशक       :- परिस पब्लिकेशन्स, सासवड, ता- पुरंदर, जि- पुणे

मुखपृष्ठ         :- चित्रकार अरविंद शेलार

स्वागत मूल्य  :- ₹ ४००/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)

*आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप), नाशिक*

(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)               संवाद:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com

चित्रपट गीतकार/ कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ट्रान्सलेटर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

गीत:- प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी


 *सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷*

ही दीपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना

💐💐

*गीत:- प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी*


प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी

आनंदाचे तोरण हे अन् हर्षाची रांगोळी IlधृII


मनामनातील जाई सारे मिटुनी अंतर

गळाभेट घेई प्यारे भाऊ, बहीण, मैतर

घुमे प्रदूषणमुक्त दिवाळीची हो आरोळी ll१ll


लाडू, करंजी स्नेहाची उधळण ही सौख्याची

सुखसमृद्धीच्या राशी न्यारी रंगत नात्याची

सुख लक्ष्मीच्या पावली मुखी हो शंकरपाळी II२II


लक्ष्मी येता घरा दारा दुःख, दारिद्र्या पिटाळी

धन, धान्या बरकत, तेजोमय सांजवेळी

शब्द फुलांची आरास सवे पुरणाची पोळी ll३ll


पर्व मंगलमय हे उजळून गेली धरा

धनारोग्य सकलांना तेजोदीप दिगंतरा

परंपरा नि संस्कृती दिव्य ही मराठमोळी ll४ll

शुभेच्छूक

*सोमनाथ पगार आणि परिवार*, नाशिक

*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक                                                 (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ट्रान्सलेटर, ऑनलाईन  डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*

सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, 

Email:- sahityatirthasp@gmail.com

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (अ वर्ग)

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद

५.विश्व मराठी परिषद

*Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Quora, Whatsapp, X(Twitter), Linked in, Instagram, SoundCloud.

💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐

©® सर्व हक्क सुरक्षित 

कृपया, https://youtube.com/c/SahityaTirth

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच  https://somnathpagar.blogspot.com

हा Blog *Follow* करून *Subscribe*  करण्यास विसरू नका.

💐🙏

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

Somnath Pagar Fan Club♻️

https://t.me/somnathpagarfanclub  *हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा*💐

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

गावाकडच्या गोष्टी - अनुभव समृद्धआठवणी

गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
आस्वादक : सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९ https://www.facebook.com/share/p/1FepSLoTbG/ माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे, 'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय. ‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर कुठंतरी स्वप्नांच्या दुनियेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. मग कालांतराने पाहुण्यासारखं गावात कधीतरी येणं-जाणं होतं, पर्यायाने काळजात गावाचं महत्व अधिकच वाढत जातं. अप्रत्यक्षपणे कळत नकळतपणे आपल्या गावाचं गावपण व्यक्ती काळजात जपत सगळीकडे अभिमानाने मिरवत असते. गावात गेल्यावर तेथील शेतीमाती, शाळा, व्यक्ती, नदीनाले, डोंगरदऱ्या पहिल्यापेक्षा आपल्याला प्रिय वाटू लागतात. आणि आपसूकच आपल्या गावावर आपण अधिकच प्रेम करू लागतो. हे सारं लिहिण्याचे कारण म्हणजे माझे मार्गदर्शक ज्येष्ठ लेखक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नामवंत मुद्रितशोधक श्री अर्जुन वेळजाळी सरांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या आत्मबंधात्मक ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री. वि. ग. बोरस्ते, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, ज्येष्ठ लेखक डॉ. यशवंत पाटील, आकाशवाणीचे माजी संचालक कवी उत्तम कोळगावकर, माजी सनदी अधिकारी डॉ. बी. जी. वाघ, ज्येष्ठ लेखक, ॲड. मिलिंद चिंधडे, ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ गजलकार तुकाराम ढिकले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक श्री. अशोक दुधारे, गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष, माणुसमित्र सुरेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नामवंत अशा ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून चित्रकार प्रमोद जोशी यांनी रेखाटलेले बोलक्या मुखपृष्टासह प्रमोद जोशी व अभिषेक भंडारे यांनी रेखाटलेली आतील रेखाचित्रे, विजयालक्ष्मी मणेरीकर यांची समर्पक प्रस्तावना तसेच वाचकांचे भावविश्व श्रीमंत करणारे मृद्गंधात माखलेल्या आठवणी व अनुभवसमृद्ध ललितलेख ही या पुस्तकाची बलस्थाने म्हणावे लागतील. साहित्यिक आपले अनुभव, आपले भावविश्व आपल्या लिखाणातून मांडत असला तरी यातून वाचकांना निखळ आनंद देणे याबरोबरच वाचकांचे मनोरंजन करत त्यांचे भावविश्व समृद्ध करणे, भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत त्यांना दिशा देणे, हेसुद्धा मुख्य हेतू असतात. हे हेतू साध्य करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे मला या पुस्तकातील लेख वाचताना जाणवल्याशिवाय राहिले नाही. असे लिखाण वाचताना वाचक रममाण होतात, त्यांना त्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. असाच अनुभव मला हे पुस्तक वाचताना आला. 'जीवन म्हणजे अनुभवाची शाळा.' पावलोपावली आलेल्या अनुभवाच्या बळावर पुढील मार्गक्रमण ठरत असले तरी भावी आयुष्याची पायाभरणी बालपणीचे अनुभव तसेच प्राप्त परिस्थितीनुसार होत असते हे नक्की. एखादा साहित्यिक आपल्या साहित्यातून जनमानसाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असतो. ओघवत्या, सहज, सोप्या रसाळ भाषेत लिहिलेले या लेख असून आपल्या अनुभवांचं दालन लेखकाने या लेखांमधून वाचकांना मोकळं करून दिलं आहे. या लेखांमधील स्थळ, काळ, पात्रे आपल्या अवतीभवती असलेली, आपल्या जीवनातील वाटतात. आणि त्यामुळेच हे लेख वाचकांच्या मनाला भिडतात. सोडताना रडलो मी गाव माता भावनांना उरला ना भाव आता (भावनांना उरला ना भाव आता) तसेच नेहमी आठवतो मला आपला गाव मनातला तिथं माणसं डोंगराएवढी माणुसकीला समुद्राची खोली मुखी झिरपते सदा ज्यांच्या काळजातली बोली (आपला गाव मनातला) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहातील वरील ओळी मला हे लेख वाचताना परत परत आठवत होते. एकूणच काय तर हे लेख वैश्विक आहेत याची प्रचीती येते. त्यामुळे मी या ओळी इथे नमूद केल्या. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटले जाते. दररोज नवनवीन अनुभवांची शिदोरी अनुभवसंपन्न करत असते. त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. एकांतात हे सारं संचित आठवत आयुष्याची वाटचाल निरंतर सुरु राहते. यातूनच ‘गावाकडच्या गोष्टी’ सारख्या आत्मबंधात्मक लेखनाचा जन्म होतो. पहिल्या लेखात आपल्या गावाची ओळख करून देताना ‘वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव !’... गावापासून दूर गेले, की गावाकडील आईवडील, शेतीवाडी, शाळा, मित्र यांची आठवण येऊन गावातील सुखाची, आनंदाची कल्पना येते अन् मन गावाकडे धाव घेऊ लागतं. अशी सहज, समर्पक सुरुवात केली असल्याने एकूणच लेखांचा आवाका सहज लक्षात येतो. परिणामी वाचकाच्या मनात पुढे काय याची उत्सुकता वाढत जाते. तसे पहिले तर लेखक हे एक हाडाचे शिक्षक तर आहेच त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिक आहे. त्यांचे ‘सुविचारातील आई’, ‘वावी : ऐतिहासिक वारसा असेलेलं गाव’, ‘शालेय विशेष दिनविशेष’ आणि आता हे ‘गावाकडच्या गोष्टी’ इत्यादी दर्जेदार साहित्यिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रत्येक पुस्तक एक उत्तम साहित्यिक दस्तऐवज ठरावे असेच आहे. अवर्षणप्रवण भागात त्यांचे गाव येत असल्याने तसेच बालपणी भयंकर दुष्काळ सहन करावा लागल्याने प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करत त्यांना शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले, त्यासाठी प्रसंगी आईला विकावे लागलेले मंगळसूत्र, याची सल त्यांना सतत बोचत असल्याने ती त्यांच्या लेखणीतून झिरपली असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. गनिमी काव्याने गायींची केलेली सुटका, बैलाशी झुंज, डोके व कान झोडपणारा पाऊस, लळा लावणारी आठवणीतील शाळा, विनातिकीट प्रवास केल्याची सल अशा चित्तवेधक लेखांसह गुरुजींनी जीवनाला दिशा दिली हे सांगायला लेखक विसरत नाही. पूर्वी गावापासून दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांना रहावं लागे, अशा वेळी गावाकडून एस.टी. मधून जेवणाचा डबा पाठवला जाई. ही महत्वाची तसेच खडतर असली तरी जीवनाला दिशा देणारी अशी आठवण त्यांनी ‘विद्यार्थ्यांची अन्नपूर्णा : एस. टी.’ या लेखात उत्तमरित्या वर्णन केली आहे. आपल्या आईच्या बाबतीत मात्र लेखक हळवे होत ' त्यागमूर्ती माझी आई ' असे सार्थ वर्णन त्यांनी आपल्या आईचे केले आहे. अर्जुन वेलजाळी सरांचे ‘गावाकडच्या गोष्टी हे प्रेरणा देणारं, मनात आपल्या गावाबद्दल प्रेम निर्माण करणारं कथन आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग बोलके व वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहेत. हे लिहिताना त्यांची स्मरणशक्ती अफलातून असल्याचे जाणवते. बालपणीच्या घटना, प्रसंग जसे की, साळुंकीला झालेली इजा, खारुताईच्या पिलांची व चिमणीची झालेली हत्त्या, त्यावेळी असलेले मित्र, लाभलेले शिक्षक व या सर्वांची नावे आजही सरांच्या लक्षात आहेत हे विशेष. फक्त आर्थिक नव्हे तर प्रेम, माया, ममता, संस्कार, निसर्ग याबाबतीत श्रीमंत असणारी ग्रामसंस्कृती आजच्या पिढीला समजण्यास हे लेख हातभर लावतात. कारण ग्रामसंस्कृतीचं चित्र डोळ्यासमोर हे लेख वाचताना निर्माण होते. लोकप्रिय लेखकांची वाक्ये, वाक्प्रचार यांची चपलख पेरणी या लेखांमध्ये आढळते. आठवणींचा धांडोळा घेत त्यांनी प्रसंग वर्णन केलेले असून वाचकांना खिळवून ठेवतील अशी लेखांची मांडणी केली आहे. बालपण, आईवडील, भाऊबहिण, शाळा, कुटुंब, शिक्षक, आपले मित्र, जनावरे, एस. टी. यांसह लेखातील विविध पात्रे व व्यक्तिमत्वे सहजच आपली वाटून जातात. आयुष्यभर आपल्या गावाची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. थोडक्यात, गावाच्या आठवणींद्वारे त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवरील गावाला आठवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लहानपणी माझे जीवन घडत असताना माझ्यावर ज्या ज्या शिक्षकांनी उत्तम संस्कार केले, मित्रांनी नि:स्पृह सहकार्य केले अन् नातेवाइकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांना माझ्या या ‘गावाकडच्या आठवणी’ सविनय समर्पित !’ अशी समर्पक कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली आहे. या लेखसंग्रहात 'वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव', 'माझ्या आठवणीतील शाळा', 'शेतक-यांची सांस्कृतिक श्रीमंती –चुरमा, तुकडे,... असे एकूण चौतीस वाचनीय लेख वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. हा उहापोह करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज शुक्रवार दि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘गावाकडच्या गोष्टी’ या लेखक अर्जुन वेलजाळी सरांच्या पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ पासून दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होत आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतीवर व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी साहित्यात / कथाविश्वात प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे एक दर्जेदार लेखसंग्रह असून वाचकांनी हा लेखसंग्रह आवर्जुन वाचावा हा आवाहन व आग्रह करून लेखक अर्जुन वेलजाळी सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! *पुस्तकाचे नाव :-* गावाकडच्या गोष्टी ( आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह ) *ISBN :-* 978-93-5650-729-6 *लेखक :-* अर्जुन वेलजाळी. *संपर्क नं.* ९०४९५२२२४० *प्रकाशक :-* ग्रंथाली, मुंबई *प्रस्तावना :-* विजयालक्ष्मी मणेरीकर *मुखपृष्ठ :-* प्रमोद जोशी *रेखाचित्रे :-* प्रमोद जोशी, अभिषेक भंडारे *स्वागत मूल्य :-* ₹ २५०/- मात्र ( सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) *आस्वादक :-* सोमनाथ पगार (सॅप), नाशिक (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी,लेखक), ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.) *संपर्क क्र.:-* ९२७३३५७१५९, *Email :-* sahityatirthasp@gmail.com फ्लॅट न. १, वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर, रेशीमबंध लॉन्समागे, हिरावाडी, पंचवटी, नाशिक - ४२२००३.

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई

पुस्तक परिचय *निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई* आस्वादक:- सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. वृक्ष वेलींनी असे बहरून यावे
हिरवे स्वप्न नयनी दिसावे चांदण्यात फिरताना मग मी गीत हिरवाईचे गावे (हिरवे स्वप्न) या ओळी आहेत कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहातील हिरवे स्वप्न या कवितेतील. अलीकडच्या काळात वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे होणारी वृक्षतोड, त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास, परिणामी निसर्गाचं बदललेलं चक्र, यामुळे सततची दुष्काळ सदृश्य परिस्तिथी आणि बरेच काही... असे असले तरी ही परिस्तिथी कायमची अशीच न राहता निच्छित बदलेल हा मनाशी आशावाद आहे. श्रावणसरी बरसून गेल्यावर हिरवाई तर होईलच त्याचबरोबर कळ्यांची फुले होतील, हे नक्की. निसर्गाच्या स्थिती संवेदनशील कवयित्रीच्या मनाला विचार करायला भाग पाडते. हेच खरे! निसर्गाचं वास्तववादी रूप व हिरवाईचं स्वप्न या संग्रहातील कविता वाचकांना दाखविण्यास कवयित्री यशस्वी झाल्या आहे, असे मला या कविता वाचताना वाटून गेले. नदी खळाळून वाहत प्रवाही राहिली तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला जीवनदान देते. दैनदिन जीवनात अशा अनेक घटना घडत असतात. त्याकडे व्यापक विचारांनी व उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर चिंतनशील व्यक्ती आपल्या परीने अर्थ लावत या विश्वाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असते. आहे त्याहून अधिक सकारात्मक व चागले कसे होईल, यासाठी हा प्रयत्न असतो. कवी मनाच्या व्यक्तीही कवितेच्या माध्यमातून जनजागृती तसेच समाज प्रबोधन करत आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असते. कवयित्री सहज लिहून जाते, इथे निळ्या भोर आभाळाची डोंगरांना चादर खळखळणाऱ्या सागराला मिळे नद्यांचा पाझर (भारत माझ्या देशा) किंवा निळ्या आकाशी निजे हे सूर्य, चंद्र, तारे होता पहाट जागे होई झाड, वेली हे जग सारे (निळ्या आकाशी) वैश्विक भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आपल्या भारत भुला निसर्गाची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वृक्षवल्लीमुळे चारी दिशा सजलेल्या आहेत. उतरेच्या हिमालयाच्या रांगा व काश्मीरसारखे नंदनवन, दक्षिणेकडील नारळाच्या हिरव्या झाडांनी बहरलेले केरळ, पश्चिमेला गुलाबी जयपूर, चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असा पूर्वेकडील आसाम अशी समृद्धता आपल्या देशाची शान आहे. इतकेच नव्हे तर निळ्या आभाळातील गृह, तारे, इथली पक्ष्यांची किलबिल हे सारं काही अभिमान वाटावं असंच आहे. या भूतलावरील प्रत्येकाचं व्यक्तीमत्व वेगळं असतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. कवितासुद्धा एक व्यक्त होत आनंद मिळवण्याचं होण्याचं मध्यम असून या व्यक्त होण्यातून निर्मितीचा वेगळाच अद्भुत आनंद मिळत असतो. यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. या कवयित्रीला असे सृजनशील मन लाभले असल्याने भोवतालीच्या निसर्गातील घडामोडी तसेच वास्तवाला कल्पनाशक्तीच्या जोरावर काव्यात गुंफण्याची क्षमता लाभली आहे. कविता ही उदात्त कला असून कविता म्हणजे भावना आणि विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरलेला लेखन प्रकार. कवितेत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब उमटते तेसेच कवितेतून जीवन कळते, समजते आणि उमगतेसुद्धा. पाऊस न पडल्याने व्याकूळ होऊन, आभाळा रे आभाळा गरज तू आता तरी वाट पाहुनी जीवाला आस लागली खरी... शमतील वेदना मातीच्या थेंब थेंब पडुनी अंगावरी दुष्काळाच्या चक्रात जगणं झालंय भारी (आभाळा गरज तू) विकासाच्या नावाखाली झाडांची झालेली कत्तल, अमर्याद कार्बन उत्सर्जन त्यामुळे ऋतुमानात झालेला बदल. परिणामी पावसाची वानवा. पाऊस पडावा म्हणून शब्दाच्या माध्यमातून आर्त हाक काळजाला चिर्र करून जाते. पाऊस पडला तर जमिनीच्या भेगा मिटतील. दुष्काळाचं चक्र सरेल. करपून चाललेलं पिक वाचेल आणि बळीराजा सुखावेल. अशी कवयित्रीला आस आहे. या संग्रहात पानोपानी निसर्ग व हिरवाई बहरलेली कारण कवयित्री पर्यावरणप्रेमी असून वृक्षरोपण व संवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे जाणवते. डोंगरदऱ्या, वृक्षवल्ली, शेतीमाती यासह निसर्गाचा कानाकोपरा जसे की वसुंधरा, सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, पशुपक्षी मेघ, आभाळ हे सारे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. अधिनिक युगात निसर्गाची हिरवाई टिकली तरच भविष्य उज्ज्वल राहील असा जणू संदेशच या कवितांमधून झिरपत आहे. असे मला वाटते. यातूनच, मन हे माझे वेडे, वाऱ्यासंगे बोले झुळझुळणारा वारा हा स्वप्नमंजुरी खोले (पावसात उनाड वारा) किंवा नका तोडू ही झाडे किडा, मुंगी, पक्षी सारे झाडावर घर त्यांचे पडतील ते उघडे (नका तोडू ही झाडे) माणूस आपल्या कुटुंबासाठी घर बांधतो, आपल्या अपत्यांची, माय-बापाची काळजी घेतो, मग किडे, मुंगी पक्षी यांचे जीवन यापेक्षा वेगळे नाही. वृक्षतोड झालीतर त्यांचेही घरटे उध्वस्त होतेच ना? हा रास्त सवाल कवयित्रीने वाचकांपुढे ठेवला आहे. आजकालच्या माणसाचे वागणे पाहून कवयित्री व्यथित झाल्याशिवाय राहत नाही, आजच्या युगात यंत्राबरोबर काम करताना माणूसही जणू यंत्र झाला कलियुगातल्या या माणसातल्या माणुसकीचा अंतच झाला... (माणुसकीला जपा) माणसातल्या माणुसकीचा अंत झाली की काय असे क्षणभर वाटते न वाटते तर लगेच, बीजाने मातीत खोल-खोलवर रुजून दबकत उगी जगावे धरतीच्या उदरात अन्न पाणी घेऊन सामावून जावे (बीजाचे वृक्षात रुपांतर) असा नवनिर्मितीचा आशावाद निर्माण करत त्यांची कविता वाचकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. या संग्रहातील कवितांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडतात. बऱ्याच रचना या तालबद्ध आहेत. यातील शब्दांना नादमाधुर्य आहे. या रचना प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडीत असून मांडलेले विचार वास्तववादी व प्रभावी आहेत. भाषा सहज सोपी विषयाला साजेशी आणि वाचनातून वाचकांना निश्चितच आनंद देणारी आहे. कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांचा ‘हिरवाई’ हा कवितासंग्रह प्रगती प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून हा संग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. आजवर या कवयित्रीला व या कवितासंग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त असून सर्वच रचना वाचनीय आहेत. कवी किंवा कवयित्री लिहते याचे कारण आजूबाजूच्या घटनांचा संवेदनशील मनावर होणारा परिणाम. यामुळे मनाची अस्वस्थता, मनातील घुसमट कमी होण्यास मदत होते. कवितेच्या रुपात तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन भावनांचा निचरा होतो, तेव्हा स्वर्गीय आनंद लाभतो. यातून वाचणाऱ्यालाही आनंद लाभतोच. या कवितासंग्रहास धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. कवी प्रा. लक्ष्मण महाडिक, यांची समर्पक प्रस्तावना तसेच कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर व साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची पाठराखण हे या संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. आपले तीर्थरूप ‘ज्यांच्या आशीर्वादाने माझे काव्य स्फुरले आणि संस्काराने जीवनाचे सूर-तालात बहरले असे माझे आई व दादांच्या चरणी’ अशा शब्दात त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कविता आहेत. एकूण ७५ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘हिरवाई’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे दुसरे कारण म्हणजे मंगळवार, दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- हिरवाई कवयित्री :- डॉ. शोभा रवींद्र सातभाई, संवाद क्र. ९०११०५९७५७ प्रकाशक :- प्रगती प्रकाशन, नाशिक प्रस्तावना :- कवी प्रा. लक्ष्मण महाडिक शुभेच्छा :- कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके पाठराखण :- ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) *आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप), संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला...

माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला... १) वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा साहित्यिक दस्तऐवज ठरावा असा कवितासंग्रह... २) या संग्रहात नांदी, वृत्तबद्ध कविता (पादाकूलक वृत्त, अक्रूर वृत्त), मुक्तछंद, अभंग (मोठा व लहान), अष्टाक्षरी, षडाक्षरी, समाक्षरी, गीत (जुन्या लोकप्रिय गीताच्या चालीवर लिहलेल्या गीतासह) तसेच गझल अशा विविध प्रकारच्या रचनांचा समावेश असून प्रत्येक रचनेच्या शीर्षकाखाली रचनेच प्रकार, वृत्त, मात्रा व लगावली नमूद केलेले आहेत. ३) नवीन किंवा प्रथमच कवितासंग्रह, कथासंग्रह वगैरे प्रकाशित करू इच्छिणाऱ्या कवी/ लेखकांसाठी मार्गदर्शक अशी कवितांची तसेच पुस्तकाची मांडणी केली असल्याने हा संग्रह आवर्जून संग्रही ठेवावा असा आहे. ४) कोरोना काळ अनुभवलेल्या प्रत्येकाच्याच तसेच या महामारीमुळे हकनाक बळी ठरलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा. तसेच आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ या संग्रहाच्या प्रती आपले आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रमंडळी यांना वाटप करू शकतात. ५) ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. अेकनाथ पगार सरांची 'कोरोना काळाचा कारुण्यबोध' अशी समर्पक प्रस्तावना/ पाठराखण या संग्रहाला लाभली आहे. ६) जेष्ठ साहित्यिक अर्जुन वेलजाळी सर, कवी, व्याख्याते, प्राचार्य राजेश्वर शेळके सर, ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे सर, ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गायकवाड सर या मान्यवरांचा मुद्रित शोधनासाठी मोलाचा हातभार, ही या संग्रहाची जमेची बाजू. ७) प्रसिद्ध चित्रकार संजय पाडवी सरांचे उत्कृष्ट व विषयाला अनुरूप असे अप्रतिम मुखपृष्ठ. ८) २५ वर्षाची परंपरा असलेल्या नामांकित पायगुण प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती. ९) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन यापूर्वी मी लिहलेल्या माझ्या इतर कवितांचा माझा 'वेदनेचे काटे' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असल्याने त्यानंतर लिहलेल्या व आता प्रकाशित होत असलेल्या 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहात चांगल्या आशयपूर्ण तसेच वाचनीय कविता आहेत, याची हमी. १०) 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहाची मूळ किंमत ₹. २५१/- असून सवलत मूल्य ₹. १५१/- मध्ये टपाल खर्चासह हा संग्रह घरपोहच पाठवला जाईल. तसेच 'वेदनेचे काटे' या कवितासंग्रहाची किंमत रोखीने फक्त ₹ ४८/- असून हा संग्रह टपाल खर्चासह फक्त ₹. ९१/- मध्ये घरपोच पाठवला जाईल. तथापि, दोन्ही संग्रह हवे असल्यास फक्त ₹. २०१/- मध्ये रोखीने किंवा टपाल खर्चासह घरपोहच पाठविले जातील. तरी कृपया, 🍃 *9226196298* या नंबर वर *फोन पे* ने किंवा 💳 *9226196298@kotak* या *UPI Id* वर रक्कम send करून स्क्रीनशॉट व पत्ता पाठवावा, ही विनंती💐🙏💐 आपला नम्र *सोमनाथ पगार* (सॅप) *(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)* सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com *गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.* सभासद: १.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन ३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ४.मराठी साहित्य परिषद ५.विश्व मराठी परिषद *मार्गदर्शक साहित्यिक/ वाचक/ आप्तेष्ट/ शुभचिंतक/ मित्रांचे मनःपुर्वक आभार* 💐🙏💐

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

शाब्बास गुरुजी - सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय शाब्बास गुरुजी – सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा *आस्वादक:- सोमनाथ पगार,*
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. बालकांच्या बालमनावर आईवडिलांनतर खरे संस्कार आपल्या शिक्षकांकडून शाळेत पहिले पाउल टाकल्यावर होतात. आईवडील चिखलाला आकार द्यावा तसे आपल्या मुलांना घडवतात तर शिक्षक आपल्या कौशल्याच्या बळावर ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांच्यात जीव भरतात. खरे तर शाळेत प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्याला/ बालकाला लाभणारे शिक्षक यावर त्याच्या भावी आयुष्याची दिशा ठरावी इतके महत्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असते. एखादी इमारत बांधतांना जर इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्यावर उभी असणारी इमारत पुढे वादळवाऱ्यात भक्कमपणे सर्व संकटांना समर्थपणे तोंड देत उभी राहू शकते, तीच गत विद्यार्थ्यांनी असते. ज्ञानदान व संस्कार करून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भक्कम पाया केवळ शिक्षकच उभारतात, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळेच शिक्षक हा चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया असतो. आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत झटत असतात, ज्ञानार्जन प्रभावी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. काहीची दाखल घेतली जाते तर काहींचे कार्य अंधारातच राहत असल्याने सर्वसामन्यांना त्याची पुसटशी कल्पनाही नसते. अशाच काही प्रयोगशील तसेच आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा अर्थात ‘सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा’ ‘शाब्बास गुरुजी’ या प्रेरक साहित्यिक लिखाणातून विद्यार्थीप्रिय तसेच उपक्रमशील शिक्षक साहित्यिक राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे यांनी मांडला आहे. चांगल्या शिक्षकांमुळेच शास्त्रज्ञ, राजकारणी, अभियंता, डॉक्टर, लेखक किंवा कलाकार घडतात. जेव्हा आपण शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलतो ; हे केवळ शैक्षणिक किंवा खेळातच नाही तर जीवनाच्या शाळेतही आहे. शिक्षक हा केवळ धडे आणि विषय शिकवणारा नसतो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक ही अशी व्यक्ती असते जी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार देवून विद्यार्थ्यांना नैतिक व चारित्र्यसंपन्न बनवून वडीलधारी मंडळी, आपला देश तसेच कला, खेळ वगैरेंप्रती श्रद्धा निर्माण करून जगण्याची पद्धत शिकवते. म्हणूनच शिक्षक हा विद्यार्थ्याचा एक मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि मित्र असतो. शिक्षणाची दिशा आणि दशा बदलणारे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, हेरंब कुलकर्णी, वारे गुरुजी, रणजीतसिंह डिसले अशा अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा आपल्या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे. सुजाण नागरिक घडवण्याचे परम कर्तव्य बजावणारे प्रयोगशील शिक्षक, शिक्षिकांच्या कार्याची तसेच नवसर्जनाच्या वाटेवर आलेल्या शाळांची माहिती समाजाला ’दैनिक सकाळ’ मधून ‘शाब्बास गुरुजी’ या सदरात लेखक राजेंद्र दिघे यांनी करून दिली आहे. शिक्षण क्षेत्राचे महत्व विशद करणाऱ्या या कर्तबगार शिक्षकांच्या व त्यांच्या आभाळाएवढ्या कार्याची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. घटणारी विद्यार्थी संख्या, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, अशी बदलती परिस्थिती, काही शिक्षकांना ‘शिक्षण सेवक’ या पदावर करावी लागणारी दमछाक अशा अनेक आवाहनांमुळे खरं तर शासकीय मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती चिंतनीय आहे. अशा आवाहनांना तोंड देत शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. पहिल्याच लेखात वर्षभर चालणाऱ्या जिल्हा परिषेदेच्या ‘हिवाळी’ येथील शाळेतील अवलिया असे सर्जनशील शिक्षक केशव गावित भेटतात. गावाशी एकरूप होत ‘हेच माझे घर, हीच माझी शाळा’ म्हणत टेक्नोसॅव्ही होत नवोपक्रमशीलतेचा ध्यास घेवून अतिदुर्गम आदिवाशी भागात वाट नसलेल्या गावात शिक्षणाची गंगा प्रवाही करून विद्यार्थ्यांचे जगणं समृद्ध करत आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरीमुळे ३६५ दिवस सतत १२ तास ही शाळा सुरु असते. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग तसेच ‘गिव्ह’चं पालकत्व हेसुद्धा औत्सुक्याचे विषय आहेत. ‘हिरावाडी’ येथील पाचटाच्या कोपीतील शाळा सलग तीन वर्षांपासून ‘अ’ श्रेणीत तर येतेच त्याचबरोबर जिल्हा गुणवत्ता समृद्धी चाचणीत ‘फाईव्ह स्टार’ मानंकात पटकावते. अशा शाळेतील अडाणी पालकांच्या लेकरांना पंख देणारे शिक्षक शशिकांत शिंदे तर फारच प्रयोगशील... गावात जायला कच्चा व चिखल तुडवावा लागणारा रस्ता, आदिवाशी, सालगडी, अडाणी शेतमजुरांची लेकरं कोटी, अब्ज, खर्व, निखर्व अशा संख्या सहज वाचतात. शिंदे गुरुजीमुळे ही शाळा आज सुसज्ज इमारत, सुंदर बगीचा, आणि सुंदर फुलझाडांसह समृद्ध वनराईने नटली आहे. स्पर्धेच्या युगात झोपडपट्टीतील विद्यार्थीसुद्धा सरस होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी सुसंस्कृत व्हावा म्हणून नाविन्य व लोकसहभागातून आपल्या शाळेचा कायापालट घडवून आणणाऱ्या, ज्यांच्या उपक्रमशीलतेची दखल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतली आहे. विद्यार्थी गरीब असले तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांची प्रयोगशीलता तसेच नवोप्रक्रमांमुळे मनपाच्या ‘आनंदवल्ली’ शाळेने कात टाकली आहे. देवळा तालुक्यातील ‘खामखेडा’ गावच्या ‘फागंदर’ आदिवाशी वस्तीवर शिक्षणाचे नंदनवन फुलवणारे उपक्रमशील शिक्षक खंडू मोरे यांचे कार्य तर अचंबित करणारे आहे. निमशिक्षक असलेल्या गुरुजींनी पदरमोड करत गोरगरीब वंचित आदिवासींची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहात आणली. आदिवाशी वस्तीतील विद्यार्थ्यांना त्यांनी चक्क विमानातून मुंबईची सफर घडवून आणली. आज जरी चांगल्या इमारतीत शिक्षणाच्या वाटेवरील डीजीटल अशी आनंदवन म्हणून ही शाळा भरत असली तरी सुरवातीला पाचटाच्या झोपडीतच नव्हे तर झाडाखालीही त्यांनी प्रसंगी शाळा भरवली. जागतिक महामारी कोरोना काळात ऑनलाईन, ऑफलाईन शक्य त्या पद्धतीने शिक्षणाचा ज्ञानयज्ञ सुरु ठेवला गेला तसेच ‘घर तेथे शाळा’ उपक्रमामुळे सुपरिचित झालेली ‘भवानीनगर’ येथील शाळा आयएसओ मानांकन मिळवत जिल्ह्यात द्वितीय वस्ती शाळा म्हणून उपक्रमशील दिव्यांग शिक्षक संदीप महाले यांच्या धडपडीमुळे नावारूपाला आली आहे. चांदवडमधील दीडशे वर्षांपूर्वी १८४५ मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यात म्हणजेच रंगमहालात भरणारी आजची दगडी शाळा जी एकेकाळी प्रतिष्टा असणारी शाळा होती, आज काळाच्या ओघात ‘जुने लोप पावावे’ तशी मोडकळीस आली होती. त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या संदीप महाले गुर्जींनी लोकसहभागातून तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने त्या शाळेला गतवैभव प्राप्त करून दिले. गुजरात राज्याच्या सीमेवर निसर्गरम्य परिसरात तीनशे लोकवस्ती असलेल्या ‘मांगलीदर’ या गावात ग्रामपंचायत, आई प्रतिष्टान, मालेगाव त्याचबरोबर राजधानी गारमेंट्स यांच्या सहकार्यामुळे तसेच कृतीशील शिक्षक राजू देवरे यांचे प्रयत्न फळाला आल्याने अवघी चार पटसंख्या असल्याने बंद पडणार असणारी बिनभिंतीची मांगलीदर शाळा बदलली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शिकणं सुलभ करणारे प्रयोगशील शिक्षक प्रवीण शिंदे यांची गाव अन् शाळेची घट्ट नाळ जपणारी ‘दापुरे शाळा’, गुणवत्तेसह इंग्रजीत अव्वल ठरणारी, तंत्रस्नेही शिक्षिका लीनाली फटकाळे यांची ‘शिवाजीनगर’ येथील आदर्शवत शाळा, टी.व्ही. पॅटर्नमुळे राज्यात प्रसिद्ध, अतिदुर्गम भागातील ‘धामकीवाडी’ येथील ज्ञानधारा रुजविणारे शिक्षक प्रमोद परदेशी यांची शाळा, आदर्श शाळेचे स्वप्न साकारणारे शिक्षक काशिनाथ सोनवणे यांची आदिवासी समाज मनावर ठसा बिंबवणारी’शेपुपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निलेश भामरेंकडून तंत्रज्ञानाला लोकसहभागाची जोड मिळवत अवघ्या वर्षभरात कायापालट झालेली ‘इन्शी’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निवृत्ती आहेर यांच्या जिद्दीने शाळेचा चेहरा मोहरा बदललेली विभागातील एकमेव ओजस’ अशी ‘भोयेगाव’ची आंतरराष्ट्रीय शाळा, उपक्रमशील शिक्षक विलास सोनवने यांच्या डिजिटल फ्लेक्सने चर्चेत असलेली ‘जनकाकर’ वस्तीशाळा, प्रयोगशील शिक्षक गोकुळ वाघ यांच्या उपयुक्त उपाययोजनांमुळे शिक्षणवारीत राज्यस्तरीय यश मिळवणारी ‘अंगणगाव’ शाळा, गणिताचे पर्यावरणप्रेमी शिक्षक योगेश महाजन यांचे कोंदण लाभलेली भौतिक सुविधांयुक्त ‘सावरगाव’ येथील कृतीशील शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी पवार यांची इंग्लिश गार्डनसोबत सफर घडवणारी ‘अजमिर सौंदाणे’ची शाळा, स्मार्ट टीचर राम तळपे यांच्या उपक्रमांचे कोंदण लाभलेली शिक्षकांच्या एकजुटीमुळे अग्रेसर ठरलेली ‘पाथर्डी’ येथील मुलींची शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रकाश परदेशी यांची किमया असणारी दुर्गम ‘हरणशिकार’ शाळा, शिक्षक पंकज सोनवणे यांच्या उपक्रमशीलतेने बदललेली अवघड वाट असूनही गुणवत्तेच्या पटलावर असलेली ‘कुसुंबीनाला’ येथील शाळा, शिक्षिका नयना वाघ यांच्या पूरक प्रयत्नामुळे त्यांच्या उपक्रमांतून सर्वांगीण विकास साधणारी ‘खर्डे’ शाळा, संवेदनशील शिक्षिका आशा सोनवणे यांची प्रेरकता तसेच उपक्रमांचे कोंदण असलेली ‘चंदनपुरी’ शाळा तसेच, प्रयोगशील शिक्षक गोकुळ निकम यांच्यामुळे गुणवत्तेचा ध्यास घेतलेली ‘हाटकरवस्ती’ शाळा, हुरहुन्नरी अभिनयशील शिक्षक देवेंद्र वाघ यांची शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारी ‘देवीची माथा’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षक जयदीप गायकवाड यांची बालमित्रच्या माध्यमातून गुणवत्तेला बळ देणारी नवोपक्रमशील ‘वाघाड’ शाळा, प्रयोगशील विज्ञान शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांची विज्ञान उपक्रमांद्वारे बलशाही भारताचे स्वप्न बघणारी ‘पिंपळगाव जलाल’ शाळा, प्रयोगशील दिव्यांग शिक्षक सोपान खैरनार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणादायी, गरुड भरारी घेणारी ‘मोरे नगर’ शाळा, प्रयोगशील शिक्षक संजय बेडसेंचा ध्यास, सातत्याने उपक्रमयुक्त गुणवंत ‘निमगुले लहान’ शाळा. शिक्षक भरत पाटील यांच्या तंत्रस्नेहाचे कोंदण राज्यात अव्वल ‘माळीनगर’ शाळा, तंत्रस्नेही इंग्रजी शिक्षक दत्तात्रय उगले यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अद्यावत विद्या मंदिर ‘पांगरी बुद्रुक’ शाळा, प्रयोगशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांची पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणारी ‘खालप फाट्याची’ शाळा, शिक्षिका नीलिमा पगार यांची नाविन्याचा ध्यास असणारी डिजिटल ‘दहीवड’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका वैशाली भामरे यांची सर्वांगसुंदर उपक्रमांची परिपूर्ण ‘मानके’ शाळा, प्रयोगशील शिक्षक हेमंत बधान यांची गुणवत्तापूर्ण स्कूल ‘खेलदरी’, उपक्रमशील शिक्षिका योगिता गायकवाड यांची आदिवासीबहुल भागातील आगळीवेगळी ‘पिंपळपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका शालिनी जाधव यांचे प्रेरक नेतृत्वामुळे शिक्षिकांच्या पुढाकाराने गुणवत्तेच्या पटलावर असणारी ‘भाटगाव’ शाळा, व्हाट्सॲपद्वारे कायापालट झालेली उपक्रमशील शिक्षक सुनील कापडणीस यांची ‘अंबासन’ शाळा, याचबरोबर, समाजप्रिय उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांची सर्वांगीण विकासमय ‘नेऊरगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक किरण अहिरे यांच्या धडाडी उपक्रमशीलतेने पटात वाढ झालेली ‘ढवळीविहीर’ शाळा, शिक्षक दादाजी देवरे यांच्या नेतृत्वात अग्रेसर, राज्यातील अव्वल सेमी ‘कळवणची’ मुलींची शाळा क्रमांक एक, तंत्रस्नेही शिक्षिका नूतन चौधरी यांची उपक्रमशील झेडपीची सेमी इंग्रजीचे धडे देणारी ‘टेहरे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रेमानंद घरटे यांची पॉवर नसल्याने मोबाईलवर धडे गिरवणारी ‘पवारवस्ती’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका चचित्रा देवरे नाविन्यतेचा वसा घेतलेली सर्वांगीण विकासाठी आदर्शवत ‘अभोणा. मुले शाळा, बदलाचे शिल्पकार उपक्रमशील शिक्षक तुषार महाजन यांची स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणारी ‘खालप’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सुरेश लिलके यांची व्यापक समाज संपर्कातून प्रकाशमान ‘शेणीत’ शाळा, प्रयोगशील शिक्षक अनिल सावंत बदलाचे शिल्पकार ठरलेली गुणवत्तेत अग्रेसर ‘भावडे’ शाळा, आंतरराष्ट्रीय शाळेसाठी धडपडणारे शिक्षक वैजिनाथ भारती यांची तंत्रज्ञानाने बदलणारी ‘एरंडगाव’ शाळा, मिशन नवोदय सक्सेस करणारे स्मार्ट प्रयोगशील शिक्षक सतीश इंगळे यांची ‘उंबरठाण’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका सविता भामरे यांची सांघिक प्रयत्नांनी शैक्षणिक पटलावर आलेली ‘उसवाड’ शाळा, विद्यार्थीप्रिय शिक्षक सुमित बच्छाव यांची शिक्षणासह जीवनमूल्ये रुजवणारी ‘गणेशनगर’ शाळा, शिक्षक सुनील पवार यांची लोकसहभागातून नावारूपाला आलेली ‘पिंपळगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सोपान बोरसे- सोनवणे जोडगळींची ज्ञानरचनावादी उपक्रमांची ‘पन्हाळे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक दिनेश सोनवणे यांची गुणवत्तेचे कृतीयुक्त धडे देणारी ‘भिलवाडी’ची शाळा, शिक्षक प्रकाश बंजारा यांची विकासाच्या पायऱ्या चढणारी ‘दिघवद’ शाळा, मुख्याध्यापक सुरेश बच्छाव यांचे प्रेरक नेतृत्व व लोकसहभागातून बदललेली ‘देवघट’ शाळा... अशा अनेक शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आपली शाळा व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट करणारे शिक्षक या प्रेरक लेखांमधून पानोपानी वाचकांच्या भेटीला आले आहेत. एक वेगळा दर्जा असणारा हा दस्तऐवज म्हणायला हरकत नाही. समाजात आदर्श असे स्थान आजही शिक्षकांना आहे. शिकवण्याची आवड आणि वचनबद्धतेसाठी हे महान शिक्षक जगभरातील इतर हजारो शिक्षकांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे जीवन विद्यार्थ्याच्या जीवनातील शिक्षकांच्या अनेक भूमिका आपल्याला दाखवतात. या शिक्षकांनी शिकवणे वर्गाच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना संधीचे जग दाखवले. मध्यंतरी खडू आणि फळा जाऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली ज्ञानदानाचे माध्यम बनते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वातावरण निर्माण झालेही असल्याचे आपण अनुभवले देखील आहे. परंतु या शिक्षकांचच्या कार्याबद्दल वाचून मन भारावून तर जातेच परंतु दर्जेदार शिक्षणासाठी खडू आणि फळा ही परंपरागत माध्यमे नेहमीच उपयुक्त राहतील, हे नक्की. सर्वच प्रेरक लेखांची भाषा ओघवती, संक्षेपी व वाचकांना सहज समजणारी आहे. मोजक्या व प्रभावी शब्दात त्यांनी आपले लेख वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहेत. लेखक राजेंद्र दिघे हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक असून आई प्रतिष्टान, मालेगावचे ते संस्थापक अध्यक्ष, म.रा. प्राथमिक शिक्षक भारती, नाशिक विभागाचे अध्यक्ष तसेच ते अनेक संस्थाच्या कार्यात सक्रीय आहे. पुस्तक हातात पडताच पुस्तकाची मांडणी भावली, एखादं क्लासिक बुक अशीच मांडणी या पुस्तकाची केलेली आहे. त्यासाठी प्रकाशकाचे विशेष अभिनंदन. तसेही चपराक प्रकाशनाने अल्पावधीत आपला नावलौकिक आपल्या दर्जेदार कार्यशैलीमुळे मिळवला आहेच. या लेखसंग्रहास संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले मुखप्रुष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके असून वाचकाला पाने पालटून लेख वाचायला प्रेरित करणारे आहे. मुखपृष्ठावरील मांडणीमुळे या पुस्तकात आत काय दडले आहे याचा सहज अंदाज येतो. तसेच विधान परिषद सदस्य मा. कपिलजी पाटील यांची प्रस्तावना तसेच माननीय मंत्री, दादाजी भुसे यांची अतिशय थोडक्यात पण समर्पक पाठराखण या पुस्तकाला लाभली असून यामुळे पुस्तकाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. माजी मंत्री आमदार छगनजी भुजबळ यांच्या शुभेच्छा ! हे या पुस्तकाचे खास आकर्षण म्हणावे लागेल. बालपणात संवेदनाचे धडे गिरवून घेणाऱ्या मायमाऊली स्व. आईस... आयुष्यात कष्ट सोसत प्रामाणिकपणे जगलेल्या आप्पांना... सतत उर्जास्त्रोत ठरलेल्या माझ्या आयुष्यातील तमाम गुरुजन, मार्गदर्शक व मित्र-मैत्रीणींना... ज्या लेकरांमुळे इथवर प्रवास सुखकर झाला त्या आजपर्यंतच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना... असे नमूद करत त्यांनी हा लेखसंग्रह अर्पण केलेला आहे. हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि २४ डिसेंबर २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात ‘शाब्बास गुरुजी’ या लेखक राजेंद्र दिघे लेखसंग्रहावर/पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यापुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत राहवी. साहित्याची सेवा घडावी. काव्य, कादंबरी, कथा, आत्मकथन, नाटके इ. वाचकांना वाचायला मिळावेत. हिच सदिच्छा ! सन्माननीय राजेंद्र दिघे सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!!! पुस्तकाचे नाव :- शाब्बास गुरुजी लेखक :- राजेंद्र दिघे, संवाद क्र. ९४२१६००७११/ ८१६९५००७००. प्रकाशक :- चपराक प्रकाशन, पुणे ISBN :- 9789391239299 प्रस्तावना : कपिलजी पाटील पाठराखण :- मा. मंत्री दादाजी भुसे शुभेच्छा :- मा. आ. छगनजी भुजबळ स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) आस्वादक: *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

अस्मिता- सकारात्मकतेचे पंख देणारी कविता

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय *अस्मिता – सकारात्मकते
चे पंख देणारी कविता* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने ‘स्त्री म्हणजे चूल आणि मुल’ अशी असलेली ओळख पुसली जाऊन आज स्त्रियांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्य व कर्तुत्वाच्या बळावर पादाक्रांत केलेली आहेत. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आपल्या साहित्यातून वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव व्यक्त करत व तसेच स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य अर्थात कथा, कविता सहज वाचायला मिळतात. साहित्य क्षेत्रातील असेच एक नाव महत्वाचे नाव म्हणजे शिक्षिका, कवयित्री सौ. आशा विनोद पाटील होय. त्यांचा ‘अस्मिता’ कवितासंग्रह वाचण्यात आल्याने हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच... मुलींसाठी काढून पहिली शाळा विद्या दानाने फुलवला मळा... मर्म जाणिले स्त्री स्वातंत्र्याचे माणूस म्हणून घडविले आम्हाला ज्या काळी स्त्रीयांना शिक्षण घेण्यास बंदी होती, त्याकाळची परिस्थितीची कल्पना न केलेली बरी. अशावेळी समाजाचा विरोध झुगारून प्रयत्नांची पराकाष्टा करत प्रसंगी हाल अपेष्टा सहन करून महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करून दिली. शिक्षणाचा कानमंत्र मिळाल्यामुळेच आज महिला सक्षम होऊ शकल्या. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही. खरं तर गृहिणी ते शक्षिका असा सावित्रीबाई यांचा समाजव्यवस्था प्रतिकूल असतानाही खडतर प्रवास होता, तोच सावित्रीचा वसा आजकालच्या स्त्री शिक्षिका आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण आजकालची स्त्री घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून आपली व्यावसायिक कारकीर्द यशस्वी पणे सांभाळताना आपण पाहतो. काळाच्या भाळावर आपल्या कार्तुत्वाच्गा ठसा स्पष्टपणे उमटवत आहे. असं आपण म्हणू शकतो. नारी तू नारायणी कर्तुत्व, मातृत्व हिरकणी झेप उतुंग घे गगनी साप्त्सुरातील तूच बंदिनी आपली समाजव्यवस्था स्त्रीला दुय्यम स्थान देत असल्याचे बोलले जाते, तशा पाऊलखुणा जाणवतातही. जर स्त्रीच या भूतलावर नसती तर ? कल्पना तशी भयावह आहे. स्त्री शिवाय माणूस अपूर्ण आहे, स्त्रीच्या उदरातून जन्म घेवून, आईच्या दुधावर पालनपोषण होऊन मग माणूस पराक्रम करायला सज्ज होतो. असे असले तरी समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबत नाही. अशा या नारीचा, स्त्रीचा नेहमी सन्मान झाला पाहिजे. ‘मैत्री’ या कवितेत कवयित्रीने मैत्रीचे सहज साध्या शब्दात महत्व अधोरेखित केल्याचे जाणवते. मैत्री दोन अक्षरं असलेला शब्द असला तरी मैत्रीच्या नात्यामुळे माणसाचा जीवन प्रवास सुखकर होतो, हे नक्की. कुणीतरी स्नेहाचे, आपुलकीचे, हक्काचे आपल्या सुखदु:खात आधार असे मैत्रीच्या अंगणात हवे असते. ज्यात आपुलकी, माया असते क्षणभर मन मोकळं करण्यासाठी. मैत्री, पहाटेच्या दवासारखी थंडगार स्पर्श करणारी मैत्री असते सुर्योद्यासारखी मनाला चैतन्य देणारी कृष्ण, सुदामाच्या मैत्रीसारखी मैत्रीची पखरण करत शब्दांचे शब्ददीप प्रज्वलित होत, विचारधारांची ही काव्यरुपी दीपमाळ मनात आनंदाचे तरंग निर्माण करते. वलयांकित शब्दात माणूस वाचते मी, प्रकाशद्विपात अंधार मालवते मी, भविष्यात प्रकाशाचे स्वप्न विणते मी, अज्ञानाच्या प्रज्वलून ज्योती,, आसमंतात जुळून नाती, शब्दात शोधते मी, माणसात दरवळते मी, सुगंधात गुलाब गंध शोधते मी... अशा आशयाच्या सकारात्मक भाव पेरणाऱ्या रचना या कवितासंग्रहात भेटतात. आता मी पुस्तके कमी माणसे अधिक वाचू लागली मुखवट्या मागचा चेहरा चेहऱ्या मागचा मुखवटा बघू लागली आयुष्याच्या या प्रवासात बरेवाईट अनुभव येत राहतात, माणूस त्यातून आपले मार्गक्रमण करत असतो. सत्य परेशानच नाही तर पराजित झालेलं पाहून कवयित्री व्यथित होते. आणि त्यामुळेच कदाचित चेहऱ्या मागचे मुखवटे वाचून सावधपणे वागलं पाहिजे हा मौलिक सल्ला वाचकांना मिळतो. मीच माझी हिम्मत म्हणून डगमगून न जाता जीवनप्रवास सुरु ठेवला पाहिजे असा सडेतोड सल्ला महत्वाचा ठरतो. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. आईचे स्मरण होताच मन माहेरी घुटमळू लागते. भर उन्हात सुखद गारवा देणाऱ्या सावलीसारखी आई सुखदुखात साथ देत असते. अंधारात काजव्याने प्रकाशून वाट दाखवावी तशीच महत्वाची व्यक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईच असते. पण हीच आई कितीही अश्रूंची लाखोली वाहिली तरी पुन्हा नेत्रास दिसत नाही. त्यामुळे जग दाखवणाऱ्या आईवडीलांना आपण जपलं पाहिजे. हे सत्य असे वास्तव आई या कवितेत अधोरेखित झाले आहे. बाप... कुटुंबाचा आधार मायेचा सागर प्रकाशाचा जागर कष्टाचा पाझर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईवडील हेच पहिला आधार व गुरु असतात. बाप प्रेरणा देणारा, अस्मिता जपणारा, विचार पेरणारा आधारवड असतो. बाप दीपस्तंभ असतो खरं तर मुलांसाठी. अनुभवाचं पाहिलं विद्यापीठ बापच असतो. कुटुंबाची ढाल असतो. असा हा वादळातील खंबीर बेट बाप आपल्या लाडाच्या लेकीचं कन्यादान करून आपलं धन परक्याच्या हवाली करतो. तोच बाप आपल्या लाडाच्या लेकीला पुढे आयुष्यभर मोरपिसासारखा काळजात जपत असतो. जीवनाला वेदनेची किनार असली तरीही सुखद रेशमी तलम वस्त्रासारखी हवीहवीशी कविता जीवनात आल्यावर कळतनकळतपणे शब्दांचा उत्सव कधी बनून जाते. कारण शब्दात सौंदर्य असते. शब्दच मशाल होऊन वाट दाखवतात. अशाच कवितेच्या माध्यमातून किल्ल्याविषयी वर्णन करताना कवयित्रीच्या शब्दांतून किल्ला बोलू लागतो की, ‘रात्रीच्या गर्भात उष:काल, मी नव्हे किल्ला’ केवळ, मी प्रेरणास्थान, मी स्फूर्तीस्थान...’ संकटे तर मानवाच्या पाचवीलाच पुजलेली असतात. त्यातच कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला होता, अशा वेळी गुरु करोना, मास्क अशा रचनांमधून कवयित्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असल्याचे लक्षात येते. सावित्री, मातृत्व, मैत्री, पुस्तक, विद्यार्थी, आई, जिद्द, महामानव, शिक्षक, संधी अशा विविध ४२ कविता या संग्रहात वाचकांना वाचायला भेटतात. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. असे असले तरी या संग्रहात काही उणीवा जरूर आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे उहापोह करता येईल. कवयित्री सौ. आशा पाटील ह्या एक कवयित्री असून त्या शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून रसिकांना ज्ञात आहेच या कवितासंग्रहाचे समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या समर्पक प्रस्तावना तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर ढोके यांची पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच भारतीय संस्कृती महिलांना देवतासमान मानते पण साहित्याने महिलांना माणूसपण दिले. स्त्री शिक्षण, साहित्य, माणूसपण व अस्मिता जपणाऱ्या सर्व स्त्रीयांना शब्दसुमनांची ही ओंजळ त्यांनी समर्पित केली आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री सौ. आशा पाटील यांच्या ‘अस्मिता’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री सौ. आशा पाटील मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा ! पुस्तकाचे नाव :- अस्मिता कवयित्री :- सौ. आशा विनोद पाटील , संवाद क्र. ९८२२७२१८६३ प्रकाशक :- गिरणादूत प्रकाशन, नाशिक प्रस्तावना :- माणूसमित्र सुरेश पवार पाठराखण :- डॉ. भास्कर ढोके स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.ट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

षढाक्षरी- समृद्धी येता ही

आज फेसबुकवर पोस्ट चाळता चाळता सहज एका कवी मित्राची पोस्ट वाचली... नोकरीनिमित्त दूर देशी, परदेशी पांगलेल्या भावंडांची तसेच त्यांची व त्यांच्या गावी असणाऱ्या आईवडीलांची काही वर्षांनी होणारी सहपरिवार भेट झाल्याची पोस्ट वाचून मी अस्वस्थ झाल्याने कविता लिहून रिता झालो. बालपणी आईवडिलांच्या छत्रछायेखाली सूखस्वप्नांची चित्रे रंगवत भावंडे कधी मोठी होतात आणि पाखरे उडून जावी तशी वेगवेगळ्या दिशांना भुर्र उडून जाऊन आपल्या जीवनात स्थिरस्थावर होतात. मात्र काळजात जपलेला गाव व रक्ताची नाती दुरावतात, हे सत्य नाकारून चालणार नाही. आणि मग कालांतराने त्यांच्या भेटी गाठी दिवाळी दसऱ्यासारख्या कधीतरी साजरे होणारे दुर्मिळ सोहळे बनून जातात. परंतु हात पाय हलविल्याशिवाय प्रगती नाही. हेच खरं... शीर्षक: समृद्धी येता ही समृद्धी येता ही माणसं पांगली का सुख पैशाने मिळाली चांगली? II१ll बालपणी भरे घरामध्ये मेळा हसणे, रुसने उत्सव सगळा II२ll पोटापाण्यासाठी दुरावली नाती मनामध्ये जळे जसे दिवा वाती II३II लाभल्या नात्याशी असावे सादर दुराव्याने आज वाढला आदर lI४II खेळतं गोकुळ व्याकुळ भेटीस प्रगत चक्रानं धरलं वेठीस II५II असा कसा ऋतू आला हा आगळा भेटण्याचा होई अनोखा सोहळा II६II सगेसोयरे ही गावी होती गोळा काही क्षणाचाच सहवास भाळा II७II मायेचं घरटं ऊब काळजात रक्ताच्या नात्याला देव पंढरीत II८II पंखामध्ये बळ आल्यावरी न्यारे दिगंतरा झेप पक्षी घेती सारे II९II *सोमनाथ पगार* (सॅप) *(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)* सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com *गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.* सभासद: १.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन ३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ४.मराठी साहित्य परिषद

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

आपले जगणे

ll आगळा वेगळा उपक्रम ll दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक आयोजित १०१ व्या कविकट्टाच्या निमित्ताने आयोजित 'काव्य लेखन कार्यशाळा' उपक्रमात मार्गदर्शक संवेदनशील साहित्यिक/ कवी विवेक उगलमुगले (Vivek Ugalmugale), प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सूत्रसंचालक/ कवी रविंद्र मालुंजकर (Ravindra Mukundrao Malunjkar) तर शेवटी कवी/ अभिनेता राजेंद्र उगले (Rajendra Ugale) यांनी उपस्थितांना काव्यलेखनाबाबत मार्गदर्शन केले. तर कवी बाळासाहेब गिरी (Balasaheb Giri) यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी दहा मिनिटात 'जगणे' हा शब्द देऊन चार ओळी लिहायला सांगितले असता मी खालील अभंग लिहला. त्यानंतर काही निवडक कवींना सादरीकरणाची संधी दिली असता मी सदर अभंग सादर केला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन माझा सत्कार करण्यात आला. समन्वयक मा. रविकांत तात्या शार्दूळ (Ravikant Rupaji Shardul), कवी दिगंबर काकड; (Digambar Kakad) तसेच सर्व संयोजन समितीचे मनःपूर्वक धन्यवाद!!! 💐🙏💐💐💐💐💐 *अभंग: आपले जगणे* चंदन जैसे हो l असावे झिजणे ll आपले जगणे l तैसे व्हावे ll१ll ओठावं साखर l जपण्या ही नाती l दीप आणि ज्योती l एकमेका llधृll श्वासांचे उखाणे l कुणाच्या कारणे ll उगा येणे जाणे l नसे जगी ll३ll अंधाराच्या पोटी l प्रकाश किरणे l नसावे झुरणे l दुःखातही ll४ll घाम आणि कर्म l जगण्याचे मर्म ll मानवता धर्म l जप व्हावा ll५ll असे जगावे की l सर्वां व्हावे प्रिय l ठेऊनिया धैर्य l कार्यसिद्धी ll६ll सोमनाथ सज्ज l घेण्या असा ध्यास ll जगणे आभास l होऊ नये ll७ll सोमनाथ पगार, ९२७३३५७१५९ *टीप*:- मूळ रचनेत फक्त पाच चरण होते, त्यात दोन चरण वाढविले असून काही आवश्यक व योग्य बदल करण्यात आले आहेत.

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

चंदनदाह - काव्यात्मक साखरपेरणी

II साहित्य तीर्थ II चंदनदाह – काव्यात्मक साखरपेरणी सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९ बालपणी खेडेगावात आम्ही मुले चिंचा, बोरं, आंबे इत्यादी फळे कच्चेच खायचो कारण ती फळे झाडावर योग्य वाढ होऊन पिकेपर्यंत आम्हाला धीर धरला जात नसायचा. त्यामुळे दात आंबायचे, खोकला यायचा. कधी कधी तर या आगाऊपणामुळे आम्हा मुलांना आईवडिलांचा मारसुद्धा खावा लागायचा. परंतु आम्हाला त्याचे काही सोयरेसुतक नसायचे. पुढे
काही दिवसानंतर तीच फळे पिकल्यावर गोड व मधुर लागायची. थोडक्यात काय? तर संयम, धीर ठेवणे जीवनात आवश्यक असते. प्रत्येक कार्याची एक निश्चित वेळ असते, हे नक्की. तोच नियम कवितेलासुद्धा तंतोतंत लागू पडतो. सुरवातीच्या काळात कवी सुचेल तसे, जमेल तसे लिहत असतो. अनुभव वाढत जातो, अभ्यास होत जातो, आणि पुढे आपण सुरवातीच्या काळात लिहलेल्या रचना बाळबोध किंवा प्राथमिक स्वरूपाच्या असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. कालांतराने अनुभव, अभ्यास व सातत्यामुळे लिखाणाची उंची वाढत जाऊन उत्तोउत्तम लिखाण आपल्या लेखणीद्वारे झिरपू लागते. हे लिहण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील ज्येष्ठ कवी सोमनाथ साखरे यांचा ‘चंदनदाह’ हा कवितासंग्रह माझ्या हाती पडल्यावर मला आपसूकच कविता वाचल्यावर व्यक्त होण्याचा मोह आवरता आला नाही. ‘प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध व्हावं’ हेच ध्येय मनात ठेवून त्यांनी विद्यार्थी जीवनापासून कविता लिहणे सुरु ठेवले, मात्र कवितासंग्रह प्रकाशनाची घाई त्यांनी मुळीच केली नाही. कदाचित यामुळेच ते दर्जेदार व अभ्यासपूर्ण लिहलेल्या कविता वाचकांच्या हाती ठेवण्यास यशस्वी झाले असावे, असे मला वाटते. आजकाल कवी व कवितांचे पीक जोमदार आले असल्याची बाब चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. कविता वाचत असतांना नेहमी शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अभ्यासलेल्या कविता कशा असायच्या याची मला आठवण होते. मात्र बर्‍याचदा तशा कविता बऱ्याच कवितासंग्रहात वाचायला मिळत नसल्याची खंत मनाला बोचत राहते. परंतु इथे सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपला वाचक म्हणून नाइलाज असतो. तरीसुद्धा काय वाचावे? याचा अधिकार वाचकाला असल्याने चांगल्या साहित्याची वाचक निच्छितच दखल घेतल्याशिवाय राहत नाही. तथापि, उत्कृष्ट यमक, रूपक, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष, स्वभावोक्ती, अतिशयोक्ती आदी काव्यालंकाराची रेलचेल या 'चंदनदाह' कवितासंग्रहातील कवितांमध्ये आढळते. त्यामुळेच या कवितासंग्रहातील कविता वाचनीय व आशयगर्भ झाल्या आहेत. पहिलीच रचना पाहू, अंगणात माझ्या I सुमनांचा सडा I उभा एक वेडा I पारिजात II साधेल का ऐसे I पारिजात व्रत II ध्यास दिनरात I मजलागी II (पारिजात व्रत, पृष्ठ क्र. १७) उनवारा, पाऊस अंगाखांद्यावर झेलत पारिजात अंगणात झुलत असतो. अंगणात नेमाने सडा पडत असतो. कवीला तो दानशूर हरिश्चंद्र भासतो. या वृक्षाने देण्याचा वसा घेतलेला असून त्याला अहंकार नसतो तर फक्त दातृत्व त्याला ठाव असते. असेच व्रत दिनरात आपल्याला साध्य व्हावं ही कवीची दुर्दम्य इच्छा आहे. ओळीला ओळी जोडून काहीतरी लिहले म्हणजे झाली कविता, हीच धारणा बऱ्याच कवींची असते. थोडा अभ्यास करून कविता लिहली तर वाचकांनाही वाचायला आवडते. हे वास्तव असूनही कवितांचा पाऊस दिनरात बरसतो आहे. मात्र या कवितासंग्रहातील कविता याला अपवाद आहे. ‘जीवन धूसर’ ही दुसरी कविता वाचल्यावर मी सहज मात्रा मोजून पाहिल्या तर ती कविता पादाकुलक वृताचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे माझ्या लक्षात आले. अशाच या कवितासंग्रहातील कविता आशयपूर्ण असून विविध छंदांमध्ये गुंफलेल्या आहेत. मधुरा भक्ती अनोखे रंग रंगी रंगले राधा गोविंद प्रीत फुलोरा न्यारा सुगंध गंध प्राशुनी समीर धुंध (मधुरा भक्ती, पृष्ठ क्र. ३७) मधुर भक्तीचे अनोखे चित्रण 'मधुरा भक्ती' कवितेत आढळते. कृष्ण राधेचा मूक संवाद सुरू असून टाळ, चिपळ्या व मृदंगाचे संगीत सुरू आहे. परिणामस्वरूप राधा स्वये श्रीरंग झाली आहे. एक प्रकारचा ताल, सूर, लय या कवितांमध्ये असल्याने वाचता वाचता वाचक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. या कवितासंग्रहातील ‘साखर ओव्या' तर कळस म्हणावा लागेल, खालील ओळी पाहू, पाठीवरती नागीण काळी सळसळणारी वेणी गं SSS! गेली दुरून फुत्कारात ती उरात कळ जीवघेणी गं SSS! (साखर ओव्या, पृष्ठ क्र. ३८) किंवा असा कसा बाई खेळ घरादारात रंगला कळीकाळाचे तांडव देव झिंगला झिंगला (देव झिंगला, पृष्ठ क्र. ८६) माणसाचा जन्म झाल्यापासून देव त्याच्या पाचवीलाच पुजलेला असूनही देव कुणाला पावल्याचं काही ऐकिवात नाही. उलट दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे पिकांचे जळून जाणे, परिणामी होणाऱ्या आत्महत्या. कधीकधी तर अख्खं गाव पोटापाण्यासाठी गाव सोडून दूर कुठेतरी स्थलांतरित होतांना कवीने पाहिले असल्याने कवी व्याकुळ आहे. या संग्रहात चांगल्या गजलही समाविष्ट आहेत. उत्कृष्ट आशय विषय असलेल्या या गजल लगावली, वृत्त, काफिया, रदिफ या सर्वच बाबतीत परिपूर्ण आहेत. 'का बोलतेस आता' या गजलेतील खालील ओळी पाहू, मौनातल्या नभाशी का बोलतेस आता हा चंद्र आवसेचा का शोधतेस आता गोडी सरून गेली केव्हाच साखरेची गाथा अपूर्णतेची का वाचतेस आता (का बोलतेस आता, पृष्ठ क्र. १५२) अशा अभिजात व मनन चिंतनातून लिहल्या गेलेल्या या रचना असून कधी गजल, कधी अभंग, कधी विराणी अशा विविध रूपात या रचना झिरपल्या आहेत. या संग्रहात निखळ निसर्गविषयक कवितांबरोबरच निखळ प्रेम कविताही आढळतात. कवीने आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे कविता म्हणजे गणपतीच्या पायीच्या पैंजनातील लहान लहान घुंगरातून निर्माण होणारा मंजुळ अर्थध्वनी होय, याच व्याख्येला अनुसरून त्यांच्या कविता नादमधुर, छंद आणि शब्दांगसुंदर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कवी कविता रचून त्याला आलेल्या अनुभूती इतरांना सांगून त्यांच्या जीवनात ‘काव्यात्मक साखरपेरणी’ करत असतो, कारण साहित्यिक हा आत्मकेंद्री नसून 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' अशीच त्याची धारणा असते. वृतबद्ध कविता, गजल, अभंग, अष्टाक्षरी (ओवी), मुक्तछंद अशा सर्व प्रकारच्या रचनांचा या कवितासंग्रहात समावेश आहे. खूप दिवसानंतर काहीतरी चांगल वाचायला मिळाल्याने सर्वांना सांगावं वाटलं म्हणून हा सारा प्रपंच... आपणही हा कवितासंग्रह वाचवा, हा आग्रह तसेच सोमनाथ साखरे हे एक उत्तम कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम असून साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या नाशिक येथील सुभाषित प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून चंदनाच्या शीतलतेबरोबरच चंदनाचा दाहसुद्धा कवीला जाणवतो याची जाणीव करून देणारे बोलके व समर्पक चित्रकार स्वप्नील नीलकंठ यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेत आतील कविता वाचायला प्रेरित करण्यास भाग पाडल्याशिवाय राहत नाही. हे या कवितासंग्रहाचे खास आकर्षण म्हणावं लागेल. तसेच प्रा. विजय काचरे सरांची 'आत्ममग्न कवितेला प्रकाशनाची झळाळी' अशा समर्पक शब्दात लाभलेली समर्पक प्रस्थावना यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच तीर्थरूप आप्पा आणि त्यांना कवी समजणारा त्यांचा अनुज चंद्रकांत यांच्या स्मृतीस त्यांनी ही साहित्यकृती त्यांनी अर्पण केली आहे. ‘चंदनदाह’ असे अर्थपूर्ण शीर्षक असलेला या कवितासंग्रहाची योग्य अशा शब्दांत पाठराखण करत ज्येष्ठ साहित्यिक तथा चित्रपट गीतकार/ कवी प्रकाश होळकर यांनी कवितासंग्रहातील कवितांचा आशय विषय सहज लक्षात आणून दिला आहे. कवी सोमनाथ साखरे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी स्वतःच व्याकरणदृष्ट्या संग्रह निर्दोष करण्याचा प्रयत्न केला असल्याचे लक्षात येते. एकूण ८७ कवितांचा या संग्रहात या समावेश असून ‘चंदनदाह ‘ या कवितासंग्रहातील कविता अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचाव्यात, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या कवी सोमनाथ साखरे यांच्या ‘चंदनदाह’’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी सोमनाथ साखरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- चंदनदाह (कवितासंग्रह) ISBN : 978-81-967055-3-4 कवी/ लेखक :- सोमनाथ साखरे प्रकाशक :- सुभाषित प्रकाशन, नाशिक मुखपृष्ठ :- स्वप्नील नीलकंठ स्वागत मूल्य :- ₹ १५०/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) सोमनाथ पगार (सॅप), नाशिक (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in sahityatirthasp@gmail.com गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights @highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar Somnath Sakhare #Commenters

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी

*सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷* हि दीपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐 *गीत:- प्रकाशाचा सण आला* *आज आपुला दिवाळी* प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी आनंदाचे तोरण हे अन् हर्षाची रांगोळी IlधृII मनामनातील जाई सारे मिटुनी अंतर गळाभेट घेई प्यारे भाऊ, बहीण, मैतर घुमे प्रदूषणमुक्त दिवाळीची हो आरोळी ll१ll लाडू, करंजी स्नेहाची उधळण ही सौख्याची सुखसमृद्धीच्या राशी न्यारी रंगत नात्याची सुख लक्ष्मीच्या पावली मुखी हो शंकरपाळी II२II पर्व मंगलमय हे उजळून गेली धरा धनारोग्य सकलांना ज्ञानदीप घरा, घरा परंपरा नि संस्कृती दिव्य ही मराठमोळी ll३ll शुभेच्छूक *सोमनाथ पगार परिवार*, नाशिक गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा अनुदान प्राप्त साहित्यिक) Mb.9273357159 Email-somnathpagar@yahoo.co.in sahityatirthasp@gmail.com *Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel, Facebook, Quora, Whatsapp, X(Twitter), Linked in, Instagram, SoundCloud. सभासद: १.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन ३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ४.मराठी साहित्य परिषद 💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐 ©® सर्व हक्क सुरक्षित कृपया, https://youtube.com/c/SahityaTirth https://youtube.com/user/SomnathPagar हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com हा Blog *Follow* करून *Subscribe* करण्यास विसरू नका. 💐🙏 *तुमचे एक सब्सक्रिप्शन* *हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन* Somnath Pagar Fan Club♻️ https://t.me/somnathpagarfanclub *हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा*💐

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा

II साहित्य तीर्थ II *आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा
* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. जन्म झाल्यावर कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रवासात थांब्याथांब्यावर भेटलेली माणसं व आलेले बरेवाईट अनुभव माणसाला शहाणे करतात, त्यामुळे भविष्याचा वेध घेत अचूक वाटचाल करण्यासठी निच्छितच मदत होते. हे नक्की... हीच शिदोरी पुढे आयुष्यभर पुरते. आणि हो, ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरली कि ओव्हरफ्लो हा ठरलेला असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या मनातील विचारांचे असते. ते साचत राहिले तर माणूस अस्वस्थ होतो. त्यामुळे मनोरंजन हा जरी मुख्य हेतू असला तरीही भावनांना वाट मोकळी करून द्यावी म्हणून कदाचित पूर्वी कथा, कविता सांगितल्या जात असाव्यात. असे वाटते. हीच परंपरा आजतागायत सुरु असावी. आत्मचरित्र हा त्याचाच एक भाग असावा, असे मला वाटते. भोगाव्या लागलेल्या वेदना, परिस्थितीशी करावे लागलेले दोन हात. यातून घडत गेलेले जीवन. हा सारा अनुभव कुणाला तरी लिखित स्वरुपात सांगितल्याने मन शांत होऊन आनंद मिळतो. कारण प्रत्येकवेळी आपलं ऐकायला हक्काचं कुणी असेलच याची शास्वती नसते. त्यातूनच डॉ. प्रशांत आंबरे यांनी लिहलेल्या ‘आठवणींची पाने’ अशा आत्मचरित्राचे लिखाण झाले आसवे. वैद्यकीय पेशातील, नाशिक येथील कवी, लेखक असलेले डॉ. प्रशांत आंबरे हे एक ख्यातनाम डॉक्टर असूनही त्यांच्यातील लेखक त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच. आईचे श्रद्धास्थान समनापूरचा गणपती, पोहेगावच्या वस्तीवरील दिवस, गणोऱ्यातील दिवस, शेतीवरचे दिवस, गणोऱ्याच्या अंबाबाईची जत्रा, आजोळचे दिवस, ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणी, गुणे शास्त्री आयुर्वेद कोलेजला प्रवेश, नगर सोडतांना, मुबईत काही दिवस, वयाच्या ५३व्या वर्षी एम,बी.ए. चा विद्यार्थी, वाचलेले पहिले पुस्तक, माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा) याचं योगदान, लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील अशा एकूण सोळा प्रकरणामधून त्यांनी या आत्मचरित्रात त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे. चित्रकार भूषण बिरारी यांनी अत्यंत सुबक व समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटलेले असून गृह, तारे सामावलेली विस्तीर्ण आकाशगंगा दिसते आहे, पृथ्वीच्या गोलावर आपल्या अस्तित्वाच्या खुणा टिकवत वृक्षवेलींच्या गराड्यात महत्वाचा भाग असलेला माणूस काहीतरी विचार करतो आहे, सांगू पाहतो आहे. मलपृष्ठावरील उगवता सूर्य हा या भूतलावरील भरारी घेऊ पाहणाऱ्या माणसाचे प्रतिनिधीत्व करत असावा असे क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही. तसेच ज्येष्ठ विज्ञान लेखक व निवृत्त प्राचार्य डॉ. किशोर पवार यांची प्रस्तावना या आत्मचरित्राची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपले आईवडील मा. श्री. विश्वनाथ लक्ष्मण आंबरे, कै. उर्मिला विश्वनाथ आंबरे, भाऊ कै. प्रदीप विश्वनाथ आंबरे यांच्या चरणी लेखकाने आपले हे आत्मचरित्र अर्पण केले आहे. आपल्या लेखणीद्वारे समाजाप्रती संवेदना अधोरेखित करणारे वैद्यकीय पेशातील एक संवेदनशील असे हे साहित्यिक असून त्यांच्या लिखाणात गत काळातील आठवांचा दरवळ व्यापलेला आहे. मनात रुंजी घालणाऱ्या अशाच ‘आठवणींचा धांडोळा’ आत्मचरित्र रूपाने आपल्या पुस्तकात लेखकाने वाचकांसाठी मांडलेला आहे. गाव-खेड्यात शिक्षण घेत लहानाचे मोठे झाल्यावर आजकाल तरुण, तरुणी सर्रास शहरची वाट धरतात, कारण खेड्यापेक्षा शहरात उपलब्ध असलेली सुखसोयीयुक्त आधुनिक जीवनशैली, उत्तम शिक्षण व्यवस्था, दर्जेदार राहणीमान, चविष्ट तसेच उत्तम खानपान, चांगली दळणवळणाची साधने याचसोबत सातत्याने होत असलेला विकास त्यामुळे उपलब्ध रोजगाराच्या संधी, तसेच झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरणामुळे सहज रोजीरोटीचा प्रश्न मिटत असल्याने हा बेरोगारांचा लोंढा सहज शहराकडे आकर्षित होतो. याउलट ग्रामीण भागात या सर्व सुविधांचा अभाव असून काबाडकष्ट व संघर्ष हा तेथील जनतेच्या पाचवीला पुजलेला असतो. अशा परिस्थितीशी दोन हात करत डॉ. प्रशांत आंबरे यांच्या सारखा एखादा ग्रामीण भागातील तरुण उच्चविद्याविभूषित होत शहराकडे धाव घेतो, त्यात नवल काय? लेखकाचे आजोबा सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ जिजाबा आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून भस्मसात झाल्यावर लेखकाचे आईवडील आपल्या मुळगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावी परत येतात आणि इथूनच खरा जीवनाचा संघर्ष सुरु होतो. तो पुढे लेखकाने डॉक्टर, वकील, व्यवस्थापन इत्यादी पदव्या घेत जीवनात स्थिरस्थावर होईपर्यंत सुरु राहतो. लेखकाच्या आईवडिलांचे कष्ट, आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं, यासाठी त्यांची तळमळ, संघर्ष, काबाडकष्ट तसेच लेखकाने अशाही संघर्षातून आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या जीवनात मिळवलेले यश याला तोड नाही. त्यांनी शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवला, ते डॉक्टर झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सांभाळत पुढे त्यांनी एल.एल.बी. चे शिक्षण घेऊन कायद्याचे ज्ञानही त्यांनी घेतले. एवढ्यावरच ते न थांबता वयाच्या त्रेपान्नाव्या वर्षी त्यांनी एम.बी.ए. ही व्यवस्थापन क्षेत्रातील पद्व्युतर पदवी मिळवली. जसे कि वर नमूद केले आहे, लेखकाच्या जीवनातील संघर्षाची सुरवात ही आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून खाक होऊन झाली होती. पुस्तक वाचतांना एखादा चलचित्रपट पहावा असे चित्र वाचकाच्या मनपटलावर उमटत जाते. ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा देत गरिबीची, हलाखीची परिस्थिती असल्याने कधीकधी पोटाला अन्नही मिळत नसे. त्यांची आई म्हणजे काकी व वडील म्हणजे काका यांचे कष्ट, त्यांनी गाळलेला घाम, दोन वेलची भ्रांत मिटवण्यासाठी गावोगाव करावं लागलेलं स्थलांतर. यात ओघानेच ग्रामीण जीवनाचे चित्रण आले, जसे कि, तिकीट काढणे शक्य नसल्याने कनातीखालून प्रवेश मिळवत कांताबाई सातारकर यांचा गावात आलेला तमाशा पाहणे, शिक्षण घेण्यासाठी करावी लागलेली पायपीठ, पाट तसेच विहिरीत पोहणे, झालेले अपघात, स्पर्धांमध्ये मिळवलेले बक्षिसे, अंगावर बोंबलाची भाजी सांडून भाजणे, पुढे दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावने, संगमनेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे, गावाकडील सणवार, नाटकामध्ये केलेला अभिनय व मिळालेले पुरस्कार, एसटीवर येणारा जेवणाचा डब्बा, अहमदनगर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेश घेवून डॉक्टर होणे, होस्टेलचे जीवन तसेच त्यांच्या वैद्यकीय पेशातील अनेक अनुभव त्यांनी वर्णन केलेले आहेत. अशा लेखकाने मनात जपलेल्या अनेक आठवणी या आत्मचरित्रात वाचकाला वाचायला मिळतात. हे सारे काही आपल्याच जीवनात किंवा सभोवताली घडत आसवे असे क्षणभर वाटून जाते. आपल्या जीवन प्रवासात अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीचा सहवास त्यांना लाभला असून त्यात आमदार, खासदार, समाजसेवक तसेच मंत्री यांचा समावेश आहे. या सर्व आठवणी या पुस्तकात तपशीलवार आढळतात. माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा), लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील इत्यादी मान्यवरांचा उल्लेख व आठवणी या पुस्तकात आढळतात. ‘आठवणींचे पाने’ असे समर्पक व आगळेवेगळे शीर्षक या आत्मचरित्राला देण्यात आले असून संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक वाचकाला स्वतःचं वाटावं असं हे पुस्तक आहे. डॉ. प्रशांत आंबरे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचे समाजतरंग हा कवितासंग्रह, मातु:श्री हे आईविषयी लिहलेले पुस्तक, मधुमेह हे आरोग्य विषयक पुस्तक व आठवणींचे पाने अशी ग्रंथसंपदा प्रकशित असून लवकरच त्यांचा ‘सत्यधारा’ हा कवितासंग्रह प्रकशित होत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी/ लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! डॉ. प्रशांत आंबरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- आठवणींचे पाने लेखक :- डॉ. प्रशांत आंबरे, संवाद क्र. ९८२३०४९३६६ प्रस्तावना :- प्राचार्य डॉ. किशोर पवार स्वागत मूल्य :- ₹ २००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. @highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights