Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
माय मराठी अमृता समान -२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद
सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२
आज २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने विद्याद्यार्थ्यांशी संवाद साधला यामित्ताने....
दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन २१ फेब्रुवारी रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्कोने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला. आणि त्यानंतर २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात शांतता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी साजरा करण्यात येत आहे. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को-UNESCO: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी जगभरात बोलल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राजी केले. ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
आदरणीय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली
के. के. वाघ अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था हे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावलौकिक मिळवलेले एक दर्जेदार शिक्षण संस्थेचे नाव. आजमितीस अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी, वरिष्ठ महाविद्यालये, शाळा-विद्यालयांतून विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत आहेत. विद्यार्थी व पालकांचा विश्वास असलेली ही शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झालेले आपल्याला पहावयास मिळते. खरंतर याचे सर्व श्रेय जाते ते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ यांची दूरदृष्टी, त्यांच्या अभ्यासू व सक्षम नेतृत्वाला.
असे आपले सर्वांचे प्रेरणास्थान, आदरणीय दिवंगत कै. बाळासाहेब देवराम वाघ उर्फ भाऊ यांना रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १०:३० वाजता वयाच्या ९०व्या वर्षी काळाने आपल्यातून हिरावून नेले. आदरणीय भाऊंच्या दुःखद निधनाने के. के. वाघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे कधीही न भरून निघणारी आपली हानी झाली आहे. भाऊंच्या नेतृत्वाची, मार्गदर्शनाची तसेच प्रेरणेची अजूनही काही काळ आपल्या सर्वांना गरज होती. मात्र आपण सारेच नियतीपुढे हतबल आहोत, हेच खरे.
आयुष्यातला सर्वात जास्त म्हणजे २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आदरणीय भाऊंचे सक्षम नेतृत्व व कार्य प्रत्यक्ष पाहण्यात व अनुभवण्यात गेला असून आपल्या के. के. वाघ परिवारातील प्रत्येक सदस्याची जडणघडण भाऊंच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने झाली आहे. कित्येक कुटुंबे भाऊंच्या कार्यामुळे स्थिरस्तावर झालेली आहेत. आपोआपच भाऊंच्या कार्याचा प्रभाव सर्वांवर होणे स्वाभाविकच आहे. आदरणीय भाऊंची एवढी सवय झाली आहे की आता भाऊ आपल्याला पोरके करून गेले, ही कल्पनाच सहन होत नाही. ‘के. के. वाघ’ हा आपला परिवारच आहे. ज्याप्रमाणे परिवारात ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शक व आदरणीय असते तसेच आदरणीय, प्रेरक व श्रद्धास्थानी आपल्यासाठी आपले भाऊ होय.
काळाची पावले ओळखून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कवाडे खुली करून सर्वसामान्य माणसांपर्यंत शैक्षणिक व सामाजिक विकास साधणारे थोर शिक्षणतज्ञ/ शिक्षणमहर्षी, ज्ञानयोगी, कर्मयोगी, कर्मधुरंधर, समाजसुधारक आदरणीय भाऊंचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अविरत कार्यरत होते असे आदरणीय भाऊ, उत्तम, कार्यक्षम बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण. आदरणीय भाऊंचे संपूर्ण आयुष्य हे एका अर्थाने तपस्वीचे आयुष्य आहे. ‘सामान्य पेहराव, मात्र व्यक्तिमत्त्व असामान्य’ असे भाऊंचे वर्णन करता येईल. कामावरची व जीवनावरची अविरत निष्ठा. हाती येईल ते काम परिपूर्णतेचा, उत्कृष्टतेचा ध्यास, हे त्यांचे वैशिष्ट्य. आदरणीय भाऊंचा आपल्या सर्वाना आदरयुक्त दरारा तर होताच यासोबत आधारही होता.
आदर्श शिक्षणतज्ञ व समाजसेवक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय भाऊ. आदरणीय भाऊंच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले असून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
प्रत्येक कामात आदरणीय भाऊंचे मार्गदर्शन असणार म्हणजे असणार. भाऊ स्वतः हजर राहून प्रत्येक काम परिपूर्ण कसे होईल? याकडे लक्ष द्यायचे. लॅबची मांडणी असो, फर्निचर बनवणे असो, किंवा विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा साहित्य असो. आदरणीय भाऊ नेहमीच स्वतः लक्ष घालून मार्गदर्शन करायचे. संस्थेची प्रत्येक इमारत, रस्ते, झाडे भाऊंच्या कार्याची साक्ष देत आहेत. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे कार्य तसे मोठे. त्यांच्या कार्याचा समर्थ वारसा आदरणीय भाऊंच्या रुपाने आपल्याला अनुभवायला मिळाला. हे आपले सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल.
आजच्या तरुणांना आदर्श ठरावा, पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा ठरावी. असे आदरणीय भाऊंचे आदर्श व प्रेरणादायी कार्य आहे. के. के. वाघ शिक्षण संस्थेचा नावलौकिक केवळ आदरणीय भाऊंची दूरदृष्टी व संशोधक वृत्ती, आधुनिक विचार यामुळेच झाली आहे. आदरणीय भाऊंची आठवण कायमच येत राहील. त्यांचे कार्य, शिकवण व मार्गदर्शन कायमच प्रेरणा देत राहील.
आदरणीय भाऊंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भाऊ तुमच्या जाण्याने
आम्ही झालो निराधार
नितीमुल्य, शिकवणी
आम्हा जगण्या आधार II१II
सूर्य, चंद्र, तारे नभी
धरेवरी आम्हा भाऊ
ज्ञान मंदिरी नेमाने
तुम्हा स्मरत हो राहू II२II
कर्मवीर बंधारे नी
पिकं शिवारी डोलती
जण मनात नांदते
खऱ्या सोन्याची पावती II३II
कर्मवीरांच्या कार्याचा
तुम्ही आदर्श वारसा
ज्ञानयोगी, कर्मयोगी
तुम्ही प्रेरक आरसा II४II
साधी राहणी तुमची
उच्च प्रेरक विचार
कार्य तुमचे आदर्श
होण्या पिढ्यांचा उद्धार II५II
नत मस्तक होऊनी
समर्पित शब्दांजली
अर्पू पवित्र स्मृतींना
भावपूर्ण श्रद्धांजली II६II
आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मागे केलेली एक उत्स्फूर्त रचना
गीत:- कर्मधुरंधर आमचे भाऊ
कर्मवीर पुत्र, शिक्षण तज्ञ
ध्यानी मनी हो शिक्षणाचा यज्ञ
कर्मधुरंधर आमचे भाऊ
प्रेरणास्थान मुखी गुण गाऊ llध्रुll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
सहकारातून समृद्धीकडे
विकासाची फुलवली हि मळे
साक्ष देई कर्मवीर बंधारे
विकासाचे दिसे रूप वेगळे
भाग्यविधात्याचे पाईक होऊ ll१ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
समाज सेवेचा खरा आरसा
कर्मवीरांचा ते थोर वारसा
ज्ञानमंदिरं उभारीले पहा
शिक्षणाचा हाती घेऊनी वसा
आधारवड हा आधार घेऊ ll२ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
साधी राहणी नी उच्च विचार
घावला नीती, मूल्यांचा भांडार
ज्ञानवंत, गुणवंत उदार
पाठीवर हात आम्हा आधार
थोर कार्याचा वसा पुढे नेऊ ll३ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
सोमनाथ पगार